पुणेरी पलटण विजयासह ‘झोन ए’मध्ये पहिल्या क्रमांकावर

प्रो कबड्डीमध्ये नागपुरात झालेल्या दुसऱ्या सामन्यात पुणेरी पलटणने दबंग दिल्ली संघाला २६-२१ अशी धूळ चारली. या सामन्यात पुणेरी पलटणचा कर्णधार दीपक निवास हुड्डा आणि राजेश मंडल यांनी पुण्याच्या विजयात मोलाची कामगिरी बजावली तर दबंग दिल्ली संघाकडून आनंद पाटील याने चांगला खेळ करत एकाकी लढत दिली.

पहिल्या सत्रात दोन्ही संघाने सामन्याची सुरुवात सावध केली. पुणेरी पलटण संघाने पहिले दोन गुण डिफेन्समध्ये मिळवले नंतर राजेश मंडलने रेडींगमध्ये एक गुण मिळवत पुण्याची आघाडी ३-० अशी केली. दिल्ली संघाला पहिला गुण मिळवण्यासाठी ४ मिनिटे प्रतीक्षा करावी लागली. सामन्यात दोन्ही संघ संयमी खेळ करत असल्याने सामना १०व्या मिनिटाला ६-३ असा होता, ज्यात पुणेरी पलटणने आघाडी मिळवलेली होती. पहिले सत्र संपले तेव्हा सामना ११-७ अश्या स्थितीत होता आणि दबंग दिल्ली ऑल-आऊट होण्याच्या उंबरठ्यावर होते.

दुसऱ्या सत्रात निर्णायक आघाडी घेण्याच्या प्रयत्नात पुणेरी संघाच्या खेळाडूंनी काही चुका केल्या आणि दबंग दिल्ली संघाने तिसऱ्या मिनिटाला सामना १३-१३ असा बरोबरीत आणला. पण दबंग दिल्ली संघाला ‘डू ऑर डाय रेड’मध्ये राजेश मंडलने धक्के दिले आणि दुसऱ्या सत्राच्या ५व्या मिनिटाला दबंग दिल्ली ऑल आऊट झाली. सामना १९-१४ अश्या स्थितीत आणून पुणेरी संघाने ५ गुणांची बढत मिळवली. आनंद पाटील याच्या काही उत्तम रेडमुळे दबंग दिल्ली संघाला सामन्यात परतण्याच्या अनेक संधी निर्माण झाल्या परंतु ते त्याचा फायदा उचलू शकले नाहीत. पुणेरी पलटणने सामन्यावर पकड ठेवत सामना २६-२१ असा जिंकला.

पुणेरी पलटणचा कर्णधार दीपक हुड्डाने सामन्यात ७ गुण मिळवले तर राजेश मंडल आणि आनंद पाटील यांनी ८ गुण मिळवले. दिल्लीचा कर्णधार असणाऱ्या मेराज शेखला सामन्यात एकही गुण मिळवता आला नाही आणि याचाच संघाला फटका बसला. मागील सामन्यातही मेराजला गुण मिळवता आला नव्हता.

या विजयासह पुणेरी पलटण १० गुणांसह ‘झोन ए’ मध्ये पहिल्या क्रमांकावर पोहचली आहे.