हा विक्रम करणारा संदीप नरवाल ठरला केवळ दुसरा खेळाडू..

प्रो कबड्डीमध्ये झालेल्या १०२ व्या सामन्यात पुणेरी पलटणने युपी योद्धा संघाला ३४-३३ असे हरवले. या सामन्यात पुणेरी संघाच्या कर्णधाराने उत्तम कामगिरी करताना १७ गुण मिळवले. त्यात १६ गुण त्याने रेडींगमध्ये मिळवले तर १ गुण त्याने डिफेन्समध्ये मिळवला. या सामन्यात विजयाचा तो सूत्रधार असला तरी देखील संदीप नरवालने एक विक्रम करून सर्वांचे लक्ष आपल्याकडे खेचून घेतले.

या सामन्यात संदीप नरवालने तीन गुण मिळवले आणि तेही डिफेन्समध्ये. हे तीन गुण मिळवत त्याने प्रो कबड्डीमध्ये २०० गुण मिळवण्याचा पराक्रम केला. डिफेन्समध्ये २०० किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळवणारा संदीप केवळ तिसरा खेळाडू बनला आहे.

डिफेन्स आणि रेडींग या दोन्ही पातळ्यांवर खेळताना संदीपने २०० किंवा २०० पेक्षा जास्त गुण मिळवले आहेत. अशी कामगिरी करणारा संदीप, मंजीत चिल्लरनंतर केवळ दुसरा खेळाडू ठरला आहे. संदीपच्या नावावर एकूण ४०३ गुण आहेत. त्यातील २०३ गुण त्याने रेडींगमध्ये कमावले आहेत तर २०० गुण त्याने डिफेन्समध्ये कमावले आहेत.

यदाकदाचित आपणास माहिती नसेल तर –

# संदीप नरवाल पहिले तीन मोसम पटणा पायरेट्स संघासाठी खेळत होता. चौथ्या मोसमात तो तेलुगु टायटन्स संघासाठी करारबद्ध झाला तर पाचव्या मोसमात त्याला पुणेरी पलटण संघाने करारबद्ध केले आहे.

# डिफेन्समध्ये सर्वाधीक गुण मिळवणाऱ्या खेळाडूंच्या यादीत संदीप नरवाल २०० गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. मंजीत चिल्लर २२८ गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे. मोहित चिल्लर २०५ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.

# सर्वाधीक एकूण गुण मिळवणाऱ्या खेळाडूंच्या यादीत संदीप नरवाल ४०३ गुणांसह नवव्या क्रमांकावर विराजमान आहे.