काहीही गमावण्यासारखे नसलेल्या दिल्लीसमोर पुण्याचे आव्हान

काल प्रो कबड्डीमध्ये पुणे लेगच्या दुसऱ्या दिवशी पुणेरी पलटणने यु मुंबाचा खूप मोठा पराभव केला. आज पुणे लेगच्या तिसऱ्या दिवशी पुणेरी पलटण समोर गमावण्यास काही शिल्लक नसलेल्या दबंग दिल्लीचे आव्हान असणार आहे.

मागील चारही मोसमाप्रमाणे दबंग दिल्ली या मोसमात देखील सेमी फायनलमध्ये किंवा प्ले ऑफमध्ये स्थान मिळवण्यात अपयशी ठरली आहे. प्रो कबड्डीच्या या मोसमात सर्वात कमी ५ सामने या संघाने जिकंले आहेत. आजच्या सामन्यात मेराज शेख, अबोफझल, निलेश शिंदे यांच्याकडून खूप अपेक्षा असणार आहेत. हा सामना जिंकून या स्पर्धेचा शेवट गोड करण्याच्या हेतूने दबंग दिल्ली मैदानात उतरेल.

पुणेरी संघाचा मागील सामन्यातील खेळ खूप जबरदस्त झाला होता. आजच्या सामन्यात देखील त्यांच्याकडून त्याच प्रकारच्या खेळाची अपेक्षा असणार आहे. मुंबा विरुद्धच्या सामन्यात स्नायू दुखावल्यामुळे संदीप नरवाल याला बदली केले होते या सामन्यात तो पूर्ण तंदुरुस्तीने मैदानात उतरेल अशी अशा आहे. पुणेरी पलटणचा संघाला चांगली लय गवसली आहे. या संघाचे सर्व रेडर आणि डिफेंडर लयीत आहेत.

डिफेन्समध्ये गिरीश एर्नेक आणि धर्मराज चेरलाथन हे उत्तम कामगिरी करत आहते. बदली खेळाडू म्हणून मैदानात उतरलेल्या रिंकू नरवाल याने देखील आपली क्षमता दाखवून दिली आहे. त्यामुळे या सामन्यात देखील विजयाची जास्त संधी पुणेरी संघाला असणार आहे.