प्रो कबड्डी: पुणेरी पलटणचा शानदार विजय, अ गटात दुसऱ्या स्थानावर

पुणे लेगच्या पाचव्या दिवशी दुसरा सामना पुणेरी पलटण आणि जयपूर पिंक पँथर्समध्ये खेळला गेला. या सामन्यात पुण्याने जयपूरवर ३८-१५ असा मोठा विजय मिळवला. आता पुण्याला झोन ए मध्ये पहिल्या क्रमांकावर येण्यासाठी आता गुजरातला लेगच्या शेवटच्या सामन्यात हरवणे गरजेचे आहे.

जयपूरचा कर्णधार मनजित चिल्लरने नाणेफेक जिकून प्रथम पुणेरी पलटनला रेड करण्यासाठी आमंत्रित केले. संपूर्ण मोसमात मनजीत चिल्लरने जास्त रेड केली नाही पण या शेवटच्या सामन्यात मनजीत चिल्लरने जयपूरसाठी दुसरिच रेड केली पण त्यामध्ये तो बाद झाला. डिफेन्स बरोबरच पुण्याच्या रेडींग डिपार्टमेंटनेही चांगली कामगिरी केली. जयपूरच्या अनुभवी रेडर जसवीर सिंगने रेडमध्ये पहिला गुण मिळवला. याही सामन्यात दोन्ही संघ डू ऑर डाय रेडवर खेळत होते.

पहिल्या सत्र अखेर पुणे १२ तर जयपूर ७ गुणांवर होती. पुण्याचा कर्णधार दीपक हुडाने रेडमध्ये ४ गुण मिळवले तर दुसरीकडे जयपूरच्या कर्णधाराने डिफेन्समध्ये ३ गुण मिळवले. दुसऱ्या सत्रात देखील दोनीही संघ डू और डाय वर खेळत होते. दुसऱ्या सत्राच्या चौथ्या मिनिटाला जयपूर ऑल आऊट झाले. तेव्हा स्कोर पुणे १८ आणि जयपूर ८ असा झाला. पुण्याकडून दीपक हुडा सतत गुण मिळवत होता पण जयपूरकडून कोणताही रेडर अशी कामगिरी करू शकला नाही.

१०व्या मिनिटाला पवन कुमारने २ गुण मिळवून संघाला सामन्यात परत आणण्याचा प्रयत्न केला. पण त्याला जसवीर सिंगने आणि मनजित ला बाकी डिफेन्सने साथ दिली नाही. सामना संपण्यासाठी ८ मिनिट राहिलेले असताना स्कोर पुणे २५ आणि जयपूर ११ असा होता. अखेर १४व्य मिनिटाला जयपूर पुन्हा एकदा ऑल आऊट झाला आणि स्कोर पुणे ३२ आणि जयपूर १२ असा झाला. सामन्यात पुण्याच्या कर्णधार दीपक हुडाने सुपर १० केला.