रोमहर्षक सामन्यात गिरीश इर्नाकच्या हाय-फायच्या जोरावर पुणेरी पलटणचा विजय !

काल झालेल्या पुणेरी पलटण आणि तेलगू टायटन्स यांच्यातील रोमहर्षक सामन्यात पुणेरी पलटणने ४२-३७ असा विजय मिळवला. पुण्याकडून रेडमध्ये कर्णधार दीपक हुडाने ९ गुण मिळवले तर डिफेन्समध्ये महाराष्ट्राच्याच गिरीश इर्नाकने हाय फाय लगावत सामन्यात ६ गुण मिळवले.

पहिल्या सत्रात पुण्याने तेलगू टायटन्सला सलग २ वेळा ऑल-आऊट केले. २ वेळा ऑल-आऊट होऊन देखील तेलगूकडे एकही गुण नव्हता. पहिल्या १० मिनिटामध्ये पुण्याकडे १८ गुण होते तर तेलगूकडे ० गुण होते. तेलुगूला ११व्या मिनिटात पहिला गुण मिळाला पण तो ही गिरीश स्वतःहून रेषेबाहेर गेला त्यामुळे. एलंगेश्वरन आर. च्या सुपर रेडमुळे पुणे १५व्या मिनिटाला ऑल-आऊट झाले.

सामन्याच्या शेवटच्या १० मिनिटात तेलगूने आपला खेळ उंचावला, राहुल चौधरीने सुपर रेड करून संघाला सामन्यात परत आणण्याचा प्रयत्न केला. पण शेवटचा एक मिनिट राहिला असताना राहुलला गिरीश आणि चिरलाथन यांनी सुपर टॅकल केले आणि सामन्याचा निकाल पुण्याच्या बाजूने लावला.