पुणेरी पलटणच्या खिलाडू वृत्ती मुळे बौद्धिक दृष्ट्या अशक्त अॅथलीट्सच्या चेहऱ्यावर स्मित

पुणे: पुणेरी पलटण तर्फे, स्पेशल ऑलिंपिक्स भारताच्या महाराष्ट्र पर्वासाठी म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिव छत्रपती क्रीडानगरीत आलेल्या बौद्धिक दृष्ट्या अशक्त अॅथलीट्स बरोबर गाठीभेठीचा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

स्पेशल ऑलिंपिक्स भारत, या राष्ट्रीय क्रीडा प्राधिकरणाच्या वतीने बौद्धिक दृष्ट्या अशक्त अॅथलीट्सच्या आयुष्यात मैदानी खेळांच्या माध्यमातून सकारात्मक बदल घडवून आणण्याचे प्रयत्न केले जातात.

अतिशय हृदयस्पर्शी अशा या भेटीच्या वेळी पुणेरी पलटणच्या खेळाडूंनी या अॅथलीट्स बरोबर आनंददायी असा वेळ घालवला. स्पेशल ऑलिंपिक्स भारत यातल्या काही अॅथलीट्सनी लॉस एंजेलिस मध्ये २०१५ सालच्या उन्हाळी तसेच २०१७ च्या हिवाळी ऑलिंपिक्स मध्ये आणि ऑस्ट्रियात झालेल्या जागतिक स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करीत सुवर्ण, रजत तसेच कांस्य पदके संपादित केलेली आहेत. पुणेरी पलटणच्या खेळाडूंना भेटून तसेच त्यांना खेळताना पाहून हे खेळाडू आणि त्यांच्या प्रशिक्षकांना अत्यानंद झाला.

आपले मनोगत व्यक्त करीत, पुणेरी पलटणचे मुख्य कार्यकारी  अधिकारी, कैलाश कांडपाल म्हणाले, ” परिवर्तन घडवून आणण्याची मोठी ताकत खेळांमध्ये असते. या खेळाडूंना भेटण्याचा एक अनन्य साधारण अनुभव आम्हाला या निमित्ताने मिळाला. हे अॅथलीट्स, त्यांच्या परीने, भारतीय क्रीडा क्षेत्रात सुधारणा घडवून आणण्याचे कार्य करीत आहेत, हे कौतुकास्पद आहे. ”

या भेटी विषयी आपले मत  व्यक्त करताना, स्पेशल ऑलिंपिक्स भारताच्या महाराष्ट्र विभागीय संचालिका, सॅन्ड्रा वाझ, म्हणाल्या, “ पुणेरी पलटण या संघाला भेटून स्पेशल ऑलिंपिक्स भारताच्या महाराष्ट्रातील खेळाडूंना अतिशय आनंद झाला. ह्या भेटीमुळे आमच्या अॅथलीट्सचे मनोबळ वाढले आणि खेळांद्वारे ह्या अॅथलीट्सना समाजात समाविष्ट करण्याच्या आमच्या प्रयत्नांना बळकटी येईल.”

आपल्या अनुभवाचे कथन करताना, पुणेरी पलटणचा संघनायक, गिरीश एर्नाक म्हणाला, ” या खेळाडूंना भेटून त्यांच्याशी चर्चा करायला मिळणे ही पुणेरी पलटणच्या खेळाडूंच्या दृष्टीने एक पर्वणी होती. खेळासाठीची आवड आणि समर्पण असेल तर काहीही सहज साध्य करता येते, हेच या खेळाडूंनी दर्शवून दिले आहे. क्रीडा क्षेत्रात सर्वोच्च स्तर गाठण्यासाठीची त्यांची भावना स्तुत्य आहे आणि त्यांच्या भविष्यासाठी मी त्यांना अनेक शुभेच्छा देतो. ”

या भेटी दरम्यान, स्पेशल ऑलिंपिक्सच्या अॅथलीट्सनी पुणेरी पलटणच्या खेळाडूंबरोबर सेल्फीज घेतल्या. पुणेरी पलटण तर्फे दिल्या गेलेल्या क्रीडा साहित्याने भरलेल्या बॅगा मिळाल्याने या अॅथलीट्सना खूप आनंद झाला.  कब्बडी सारखा खेळ तळागाळापर्यंत नेण्यासाठी झटणारे पुणेरी पलटणचे खेळाडू तसेच व्यवस्थापकांसाठी हा एक अवर्णनीय अनुभव होता.