उद्या पुणेरी पलटण करणार दुसऱ्या क्रमांकासाठी प्रयत्न

प्रो कबड्डीमध्ये पुणे लेगच्या पाचव्या दिवशी १२८व्या सामन्यात पुणेरी पलटण आणि हरयाणा स्टीलर्स आमने सामने येणार आहे. या आधीही पुणेरी पलटणचे २ सामने हरयाणा स्टीलर्स संघासोबत झाले होते. दोन्हीही सामने पुणेरी पलटण संघाने ३८-२२ व ३७-२५ असे जिंकले आहे. त्यामुळे उद्याचा सामना जिंकण्यासाठी पुणेरी पलटण संघ १००% प्रयत्न करणार.

पुणेरी पलटण संघाने १९ सामन्यांपैकी १४ सामने जिंकलेले असून फक्त ५ सामने हरलेले आहेत. त्यांचे एकूण गुण ७३ आहेत. झोन ए मध्ये पुणेरी पलटण ३ क्रमांकावर आहे. दुसऱ्या क्रमांकावर हरयाणा स्टीलर्स संघ असून त्यांचे ७४ गुण आहे. पुणेरी पलटण फक्त १ गुणाने हरयाणा स्टीलर्स संघाच्या मागे आहे. ते उद्याच्या सामन्यात हा १ गुण भरून काढतील असा अंदाज वर्तविला जात आहे.

पुणेरी पलटण संघाचा मागील सामना दबंग दिल्ली या संघासोबत होता. हा सामना पुणेरी पलटण संघाने ३४-३१ असा जिंकला होता. पुणेरी पलटण संघाचा कर्णधार दीपक हुड्डाने १० गुण मिळविले. या सामन्यात संघामध्ये सर्वात जास्त त्याने गुण मिळविले असून रेडर राजेश मोंडल ७ डिफेंडर धर्मराज ३ आणि रिंकू नरवाल याने १ गुण मिळवून संघाला जिंकवून देण्यास मदत केली.

हरयाणा स्टीलर्स संघाचा मागील सामना जयपूर पिंक पँथर्स संघासोबत होता. हा सामना हरयाणा स्टीलर्स संघाने ३७-२७ अश्या १० गुणांच्या फरकाने जिंकले. संघाचा कर्णधार सुरेंदर नाडाने ८, रेडर प्रशांत कुमारने ७, दिपक कुमार ८, वझीर सिंग ६ गुण मिळविले. संघातील सर्वच रेडरने चांगली कामगिरी केली. तर संघातील डिफेंडर्सची कामगिरी चांगली नसल्याने कामगिरी सुधारवण्याची संधी त्यांना या सामन्यात आहे.

दोन्ही संघ गुणांमध्ये पहिल्या ३ क्रमांकामध्ये गणले जाणारे संघ आहेत. जरी हरयाणा स्टीलर्स २ क्रमांकावर असला तरी उद्याच्या सामन्यात पुणेरी पलटण या संघाला हरयाणा स्टीलर्सला हरवून २ क्रमांकावर जाण्याची संधी आहे. पहिल्या क्रमांकावर असलेला गुजरात फॉरचून जायन्टस संघ फक्त ९ गुणांनी पुणेरी पलटण संघाच्या पुढे आहे.