अखिल भारतीय मानांकन पुरुष व महिला टेनिस स्पर्धेत जयेश पुंगलिया, नताशा पल्हा यांना विजेतेपद

पाचगणी । रवाईन हॉटेल यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या रवाईन हॉटेल अखिल भारतीय मानांकन पुरुष व महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीत पुरुष गटात चौथ्या मानांकीत जयेश पुंगलियाने, तर महिला गटात नताशा पल्हा या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून विजेतेपद संपादन केले.

रवाईन हॉटेल, पाचगणी येथील टेनिस कोर्ट येथे पार पडलेल्या या स्पर्धेत एकेरीत अंतिम फेरीत पुरुष गटात चौथ्या मानांकित व महाराष्ट्राच्या जयेश पुंगलियाने तिसऱ्या मानांकित पंजाबच्या इशाक इकबालचा 6-2, 3-6,6-0असा तीन सेटमध्ये पराभव करून या गटाचे विजेतेपद पटकावले.

जयेश हा पीवायसी हिंदू जिमखाना येथे प्रशिक्षक हेमंत बेंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. दुहेरीत अंतिम फेरीच्या लढतीत फैजल कुमारने फरदीन कुमारच्या साथीत निकित रेड्डी व ऋषी रेड्डी यांचा 3-6, 7-6(2), 10-6असा टायब्रेकमध्ये पराभव करून विजेतेपद मिळवले.

दुहेरीतील विजेत्या जोडीला 7760/- रुपये व करंडक, तर उपविजेत्या जोडीला 3960/-रुपये व करंडक अशी पारितोषिके देण्यात आली.

महिला गटात अंतिम फेरीच्या लढतीत चुरशीच्या झालेल्या सामन्यात अव्वल मानांकित गोव्याच्या नताशा पल्हाने दुसऱ्या मानांकित हुमेरा शेखचा 3-6, 6-1, 6-1असा तीन सेटमध्ये पराभव करून या गटाचे विजेतेपद संपादन केले.

नताशा हि गोवा येथे भेमटे महाविद्यालयात शिकत असून पीवायसी हिंदू जिमखाना येथे प्रशिक्षक हेमंत बेंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. दुहेरीत हुमेरा शेख व सालसा आहेर या जोडीने नित्याराज बाबुराज व सौम्या विज यांचा 6-2, 6-3 असा सरळ सेटमध्ये पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली.

दुहेरीतील विजेत्या जोडीला 5040/-रुपये व करंडक, तर उपविजेत्या जोडीला 2640/-रुपये व करंडक अशी पारितोषिके देण्यात आली.

स्पर्धेतील एकेरी पुरुष गटातील विजेत्या खेळाडूला 15500/- रुपये व करंडक, तर उपविजेत्या खेळाडूला 10800/- रुपये व करंडक अशी पारितोषिके देण्यात आली. महिला गटातील विजेत्या खेळाडूला 10400/- रुपये व करंडक, तर उपविजेत्या खेळाडूला 7200/- रुपये व करंडक अशी पारितोषिके देण्यात आली.

स्पर्धेचे पारितोषिक वितरण लगान व जोधा अकबरमधील अभिनेता अमिन हाजी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पर्धा संचालक जावेद सुनेसरा व वैशाली शेकटकर आदी मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: एकेरी: अंतिम फेरी: पुरुष गट:
जयेश पुंगलिया(4)वि.वि.इशाक इकबाल(3) 6-2, 3-6,6-0
महिला गट:
नताशा पल्हा(1)वि.वि. हुमेरा शेख(2) 3-6, 6-1, 6-1
दुहेरी: अंतिम फेरी: पुरुष गट:
फैजल कुमार/फरदीन कुमार वि.वि. निकित रेड्डी/ऋषी रेड्डी 3-6, 7-6(2), 10-6;
महिला गट:
हुमेरा शेख/सालसा आहेर वि.वि.नित्याराज बाबुराज/सौम्या विज 6-2, 6-3;