पीव्ही सिंधूची इंडिगो एयरलाईन कंपनीवर जोरदार टीका

भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने आज ट्विटरवर इंडिगो एयरलाईन कंपनीवर वाईट आणि उद्धट वागणूक मिळाल्याची टीका केली आहे. ती आज मुंबईला प्रवास करत होती तेव्हा तिला हा अनुभव आला.

तिने तिच्या ट्विटमध्ये विमानतळावरच्या अजितेश नावाच्या एका कर्मचाऱ्याबद्दल टीका केली आहे. तिने तिच्या ट्विटमध्ये लिहिले आहे की “सांगायला वाईट वाटतंय पण मला आज एक खूप वाईट अनुभव आला. जेव्हा मी ६इ ६०८ फ्लाईटने मुंबईला जाण्यासाठी प्रवास करत होते तेव्हा अजितेश नावाच्या एका कर्मचाऱ्याकडून त्रास झाला”

त्याचबरोबर तिने अजितेश या कर्मचाऱ्याबद्दल लिहिले आहे की ” अजितेश हा कर्मचारी माझ्याशी खूप वाईट आणि उद्धट वागला. जेव्हा एयर होस्टेस आशिमा त्याला प्रवाश्यांशी म्हणजे माझ्याशी व्यवस्थित वागण्याचा सल्ला देत होती पण मला आश्चर्य वाटलं तो तिच्याशी उद्धट वागत होता. जर अश्या प्रकारची लोक इंडिगो सारख्या प्रतिष्ठित एयरलाईन कंपनी असतील तर ते त्या कंपनीची प्रतिष्ठा पणाला लावतील”

सिंधूबरोबर या प्रवासात तिचे वडीलही होते. ते म्हणाले, ” विमानतळावरील स्टाफने वर्तन चांगले नव्हते. ते सिंधूच्या बॅग व्यवस्थित हाताळत नव्हते. तिने त्यांना विनंती केली की यात माझ्या बॅडमिंटनच्या रॅकेट आहेत तरीही तो व्यक्ती उद्धटपणे वागत होता. एअर होस्टेसने यात लक्ष दिले तर त्यांनाही त्या व्यक्तीने उद्दामपाने वागणूक दिली. याचमुळे सिंधूने ट्विट केले. ”

यावर इंडिगोने या प्रकरणात लक्ष घालू असे सांगितले आहे आणि तिला या प्रकरणाबद्दल संपर्कात राहण्याची विनंती केली आहे.

नंतर इंडिगोकडून सांगण्यात आले की सिंधूबरोबरच्या बॅग आणि इतर सामान खूप मोठे होते आणि ते नंतर कार्गोमध्ये हलवण्यात आले. हा एक रोजच्या कामाचा भाग आहे.