पीव्ही सिंधू कोरिया ओपनच्या उपांत्यफेरीत

भारताची स्टार महिला बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू हिने कोरिया ओपन सुपरसेरीजची उपांत्यफेरी गाठली आहे. उपउपांत्यफेरीच्या सामन्यात तिने जपानच्या मिनात्सू मितानी हिचा २१-१९, १६-२१, २१-१० असा पराभव केला. या सामन्यात उत्तम खेळाचे प्रदर्शन करताना पूर्ण कोर्टचा सिंधूने उपयोग केला. तिचे फोरहँडच्या फटक्यांनी सामन्याचा निर्णय तिच्या बाजूने लावला. हा सामना जिंकण्यासाठी सिंधूला ६३ मिनिटे लागली.

पहिल्या सेटमध्ये सुरुवातीला सिंधूने ५-२ अशी आघाडी घेतली. मितानीने तिची आघाडी कमी करत पहिला सेट ८-६ असा केला. सामन्यात मिड इंटरव्हलसाठी थांबला तेव्हा मितानी ११-९ अशी आघाडीवर होती. सिंधूने त्यानंतर हा सेट १३-१३ असा बरोबरीत आणला. दोन्ही खेळाडू १९-१९ अश्या बरोबरीत आल्यावर सिंधूने आपला खेळ उंचावत पहिला सेट २१-१९ असा जिंकला.

दुसऱ्या सेटमध्ये मितानी हिने उत्तम प्रदर्शन करताना ५-१ अशी आघाडी सिंधूने सलग गुण मिळवत तिची आघाडी ५-४ अशी केली. दुसऱ्या सेटमध्ये दोन्ही खेळाडू ८-८ अश्या बरोबरीत होत्या. त्यानंतर मितानीने सेटवर वर्चस्व गाजवत १९-१६ अशी आघाडी घेतली. नंतर सलग दोन गुण मिळवत मितानीने दुसरा सेट २१-१६ अशा जिंकला.

सामन्याचा निकाल निर्णायक तिसऱ्या सेटमध्ये लागणार होता. या सेटमध्ये सुरुवातीला सिंधूने ६-२ अशी आघाडी मिळवली. मितानीचे काही फटके नेटमध्ये पडल्यामुळे सिंधूने निर्णायक सेटमध्ये ९-३ अशी मोठी आघाडी मिळवली. त्यानंतर सिंधूने या सेटमध्ये वर्चस्व स्थापन करताना १५-९ अशी आघाडी मिळवली. यातून विरोधी खेळाडूला सावरण्याची संधी न देता सिंधूने तिसरा सेट २१-१० असा जिंकत सामना आपल्या नावे केला.