एच एस प्रणॉय, श्रीकांत , सिंधु फ्रेंच ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत

काल भारतीय बॅडमिंटनपटूंनी फ्रेंच ओपन सुपर सिरीज मध्ये दमदार कामगिरी केली. भारताचे एच एस प्रणॉय, किदांबी श्रीकांत, पी व्ही सिंधू यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.

नुकतेच डेन्मार्क ओपन सुपर सिरीजचे विजेतेपद मिळवलेल्या श्रीकांतने फ्रेंच ओपेनच्याही स्पर्धेत आपला धडाका कायम ठेवला आहे. त्याने काल हाँग काँगच्या वोन्ग विंग की विन्सन्टला सरळ सेटमध्ये पराभूत केले. ३७ मिनिटे चाललेल्या या लढतीत श्रींकांतने २१-१९,२१-१७ असा विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरी गाठली.

त्याच बरोबर ऑलिम्पिक रौप्य पदक विजेती पी व्ही सिंधूने जपानच्या सायका ताकाहाशीला सरळ सेटमध्ये सहज पराभूत केले. ३९ मिनिटे चाललेल्या या सामन्यात जागतिक क्रमवारीत २ऱ्या क्रमांकावर असणाऱ्या सिंधूने २१-१४, २१-१३ असा ताकाहाशीवर विजय मिळवला आणि उपांत्यपूर्व फेरी गाठली.

श्रीकांत आणि सिंधू पाठोपाठ यावर्षीच्या अमेरिकन ओपन विजेत्या एच एस प्रणॉयने काल डेन्मार्कच्या हंस क्रिस्टिअन विट्टीनघुसला पराभूत केले. त्याने २१-११, २१-१२ असा विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.

त्याचबरोबर त्याने त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम क्रमवारी पुन्हा मिळवली आहे तो आत्ता १२ व्या स्थानी आहे. त्याने काल मिळवलेल्या विजयाबद्दल ट्विट केले आहे त्यात त्याने कालचा विजय चांगला होता असे म्हटले आहे.

एकेरी मध्ये भारतीय बॅडमिंटनपटू चांगली कामगिरी करत असताना पुरुष दुहेरीतही सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी यांनीही काल विजय मिळवला आहे. त्यांनी मॅड्स कॉनरॅड पीटरसन आणि मॅड्स पिलेर कोल्डींग या डेन्मार्कच्या जोडीला हरवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. याआधी त्यांनी यावर्षीची कोरिया ओपनची उपांत्यपूर्व फेरी गाठली होती.

या स्पर्धेत भारताची फुलराणी सायना नेहवालला मात्र पराभवाला सामोरे जावे लागले. तिला अकान यामागूचीने २१-९, २३-२१ असे हरवले. त्याचबरोबर महिला दुहेरीच्या अश्विनी पोनप्पा आणि सिक्की रेड्डीलाही काल पराभव स्वीकारावा लागला.

आज स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी रंगणार आहे. यात एकेरीमध्ये श्रीकांतचा सामना चीनच्या शी युकीशी , सिंधूचा चीनच्याच चेन युफेईशी तर प्रणॉयचा सामना कोरियाच्या जिऑन ह्येयॉक जीनशी होणार आहे. याचबरोबर पुरुष दुहेरीत सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी यांचा सामना डेन्मार्कच्या मॅथिस बोई आणि कार्स्टन मोजनसन यांच्याशी रंगणार आहे.