हाँग काँग ओपन: पीव्ही सिंधूचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

सध्या सुरु असलेल्या हाँग काँग ओपन सुपर सिरीज स्पर्धेत भारताची बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने आज जपानच्या आया ओहोरी हीचा पराभव करत महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.

ऑलिम्पिक रौप्य पदक विजेती सिंधूपुढे ओहोरीला आव्हान उभे करता आले नाही. ३९ मिनिटे चाललेल्या या लढतीत पहिला सेट सिंधूने २१-१४ अश्या फरकाने सहज जिंकला. तर दुसऱ्या सेट मध्ये ओहोरीने सिंधूला लढत देण्याचा प्रयत्न केला पण अखेर सिंधूने २१-१७ अश्या फरकाने हा सेट जिंकून सामनाही आपल्या नावावर केला.

जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असणाऱ्या सिंधूचा पुढील उपांत्य फेरीतील सामना जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असणाऱ्या जपानच्या अकान यामागूचीशी होणार आहे. याआधीही या दोघी फ्रेंच ओपन सुपर सीरिजच्या उपांत्य फेरीत आमने सामने आल्या होत्या. या सामन्यात यामागूचीने विजय मिळवला होता.