राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय पथकाचे नेतृत्व पी. व्ही. सिंधूकडे

रिओ ऑलिम्पिक रौप्य पदकविजेती पी. व्ही. सिंधूकडे गोल्ड कोस्ट २०१८ च्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय पथकाचे नेतृत्व देण्यात आले आहे. या स्पर्धेची सुरूवीत ऑस्ट्रेलियाच्या गोल्ड कोस्ट येथे ४ एप्रिलला होणार आहे. भारतीय ऑलिम्पिक संघटनेने यासंदर्भातली अधिकृत घोषणा केली आहे.

गेल्या वर्षभरातील सिंधूची जागतिक बॅडमिंटनमधील कामगिरी पाहता ऑलिम्पिक संघटनेने सायना नेहवाल, मेरी कोम यांसारख्या वरिष्ठ खेळाडूंना वगळून सिंधूला हा बहुमान दिला आहे.

सायना नेहवाल आणि मेरी कोम यांची ही दुसरी राष्ट्रकुल स्पर्धा असणार आहे. मात्र या दोन्ही खेळाडूंना आतापर्यंत भारतीय पथकाचं नेतृत्व करण्याचा बहुमान मिळालेला नव्हता.

गेल्या वर्षभरात सिंधूने आंतरराष्ट्रीय सामन्यांत केलेला खेळ पाहता, आगामी राष्ट्रकुल स्पर्धांमध्येही तिच्याकडून पदकाची आशा व्यक्त केली जात आहे.

मागील तीन वर्षानंतर पहिल्यांदाच राष्ट्रकुल स्पर्धेत एखादा बँडमिंटनपटू ध्वजधारक होणार आहे. मागील तीनही वर्ष हा मान नेमबाजांनी पटकावला होता. याआधी २००६ मध्ये राज्यवर्धन सिंग राठोड, २०१० ला अभिनव बिंद्रा तर २०१४ ला विजय कुमार हे राष्ट्रकुल स्पर्धेत ध्वजधारक होते.

भारतातील विविध १५ क्रीडा प्रकारातील खेळाडु या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. बॅडमिंटन, बास्केटबॉल, बॉक्सिंग, सायक्लिंग, जिमनॅस्टिक्स, हॉकी, लॉन बाउलिंग, पॅरा स्पोटर्स यासह विविध खेळांमधील २२२ खेळाडू या स्पर्धेत भारताचे प्रतिनीधीत्व करणार आहेत.