पीवायसी-गोल्डफिल्ड-मांडके चषक क्रिकेट स्पर्धेत डेक्कनच्या धीरज फतंगरे व स्वप्निल फुलपगारे यांची शतकी भागीदारी; पहिल्या दिवसअखेर डेक्कन जिमखाना संघाचे वर्चस्व

पुणे। पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित पीवायसी-गोल्डफिल्ड-मांडके चषक या सर्वातजुन्या व अनोख्या निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत पहिल्या डावात डेक्कन जिमखाना संघाने अचूक गोलंदाजी करत पूना क्लब संघाला 175 धावांवर रोखले व त्यानंतर धीरज फतंगरे(नाबाद 91धावा) व स्वप्निल फुलपगारे(नाबाद 41धावा)यांनी तिसऱ्या गडयासाठी 105 धावांची भागीदारी करून पहिल्या दिवशी वर्चस्व राखले.

डेक्कन जिमखाना येथील क्रिकेट मैदानावर सुरु असलेल्या या सामन्यात डेक्कन जिमखाना संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. डेक्कनच्या अचूक गोलंदाजी व सुरेख क्षेत्ररक्षणापुढे पूना क्लब संघाचा डाव 37षटकात 175 धावांवर संपुष्टात आला. पण त्यांचे 10 गडी बाद झाल्यामुळे पूना क्लबची अंतिम धावसंख्या 125धावा (वजा50धावा) झाली. सलामीचे फलंदाज झटपट बाद झाल्यानंतर मधल्या फळीने संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. यात अकिब शेख 31धावा व ऋषीकेश मोटकर 24धावा यांनी चौथ्या गडयासाठी 75 चेंडूत 57 धावांची भागीदारी केली.

त्यानंतर आशिष सूर्यवंशी 47 धावा व ओंकार आखाडे 30धावा यांनी सातव्या गडयासाठी 103 चेंडूत 70 धावांची भागीदारी केली.डेक्कनकडून मुकेश चौधरीने शिस्तबद्ध गोलंदाजी करत 26 धावांत 4 महत्वपूर्ण गडी बाद केले. प्रखर अगरवालने 42धावात 2 गडी, तर आशय पालकर(30-1), धीरज फतंगरे(33-1), आर्यन बांगळे(37-1)यांनी प्रत्येकी एक गडी बाद करून पूना क्लबला 175धावांवर रोखले.

या आव्हानाचा पाठलाग करताना डेक्कन जिमखाना संघाने आजदिवस अखेर 27षटकात 2बाद 149धावा केल्या. यामध्ये धीरज फतंगरेने संयमपूर्ण खेळी करत 115 चेंडूत 10 चौकार व 1षटकारांच्या मदतीने नाबाद 91 धावांची खेळी केली. धीरजला स्वप्निल फुलपगारेने 70 चेंडूत नाबाद 41धावा काढून सुरेख साथ दिली. धीरज व स्वप्निल यांनी तिसऱ्या गडयासाठी 147 चेंडूत 105 धावांची भागीदारी करून संघाला सुस्थित आणून ठेवले. पहिल्या डावातील डेक्कन जिमखाना संघाचा अजून उर्वरित 13 षटकांचा खेळ बाकी आहे.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:

पहिला डाव: पूना क्लब: 37षटकात सर्वबाद 125धावा(175-50धावा)(आशिष सूर्यवंशी 47(70), अकिब शेख 31(55), ओंकार आखाडे 30(73), ऋषीकेश मोटकर 24(26), यश नाहर 16(35), मुकेश चौधरी 8-26-4, प्रखर अगरवाल 8-42-2, आशय पालकर 7-30-1, धीरज फतंगरे 6-33-1, आर्यन बांगळे 8-37-1) वि.डेक्कन जिमखाना: 27षटकात 2बाद 149धावा(धीरज फतंगरे नाबाद 91(115,10×4,1×6), स्वप्निल फुलपगारे नाबाद 41(70,3×4), अभिषेक ताटे 11, धनराज परदेशी 5-13-1, सौरभ यादव 5-30-1).