अशी आहेत विश्वचषक २०१९च्या सेमीफायनलमध्ये राहिलेल्या ३ जागांसाठीची समीकरणं

लंडन। 2019 क्रिेकेट विश्वचषकातील 32 वा सामना मंगळवारी (25 जून) इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात लॉर्ड्सवर पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 64 धावांनी विजय मिळवला. याबरोबरच ऑस्ट्रेलियाने या विश्वचषकातील उपांत्य फेरीतील प्रवेशही निश्चित केला. या विश्वचषकात उपांत्य फेरीत पोहचणारा ऑस्ट्रेलिया पहिलाच संघ ठरला आहे.

त्यामुळे आता उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी तीन जागा शिल्लक राहिल्या आहेत. तसेच अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांचे स्पर्धेतील आव्हान याआधीच संपुष्टात आले आहे. त्यामुळे आता इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, बांगलादेश, पाकिस्तान, विंडीज आणि श्रीलंका संघांना उपांत्य फेरीतील उर्वरित 3 जागांसाठी लढावे लागणार आहे.

उपांत्य फेरीत प्रवेशासाठी अशी आहेत सर्व संघासमोरील समीकरणे – 

ऑस्ट्रेलिया – प्रवेश निश्चित

दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान – आव्हान संपुष्टात

भारत – भारतीय संघ सध्या गुणतालिकेत 5 सामन्यांपैकी 4 विजयी, आणि 1 अनिर्णित सामन्यांसह तिसऱ्या स्थानावर आहे. भारताचे एकूण 9 गुण आहेत. तसेच भारताचे अजून 4 सामने बाकी आहेत.

त्यामुळे 4 सामन्यांपैकी दोन सामन्यातील विजय भारताला उपांत्य फेरीतील जागा पक्की करुन देतील. तसेच भारतीय संघ गुणतालिकेतील अव्वल स्थानासाठीही स्पर्धेत आहे.

न्यूझीलंड – भारताप्रमाणे न्यूझीलंडनेही अजून एकाही सामन्यात पराभव स्विकारलेला नाही. त्यांनी 6 सामन्यांपैकी 5 सामन्यात विजय मिळवला आहे. तर एक सामना त्यांचा पावसामुळे रद्द झाला आहे. त्यामुळे ते 11 गुणांसह सध्या गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहेत.

त्यांना उपांत्य फेरीतील स्थान पक्के करण्यासाठी त्यांच्या उर्वरित 3 सामन्यांपैकी केवळ 1 विजयाची गरज आहे. त्यांचे उर्वरित तीन सामने पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड बरोबर होणार आहेत.

इंग्लंड – विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानले जाणाऱ्या इंग्लंड समोर आता उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी मोठी आव्हाने समोर उभी राहिली आहेत. त्यांनी त्यांच्या 7 सामन्यांपैकी 3 सामन्यात पराभव स्विकारला आहे आणि 4 सामन्यात विजय मिळवून 8 गुणांसह ते गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर आहेत.

त्यांचे पुढील साखळी फेरीतील उर्वरित दोन सामने भारत आणि न्यूझीलंड या बलाढ्य संघाविरुद्ध होणार आहेत. तसेच त्यांना या स्पर्धेतील त्यांचे आव्हान टिकवून ठेवण्यासाठी या दोन्ही सामन्यात विजय आवश्यक आहे.

पण जर इंग्लंडला यातील एकाच सामन्यात विजय मिळवता आला तर त्यांना श्रीलंका, बांगलादेश आणि पाकिस्तान या सर्व संघांनी एक तरी सामन्यात पराभव स्विकारावा अशी आशा करावी लागेल.

या तीन संघांनी जर एका सामन्यात पराभव स्विकारला तर श्रीलंका जास्तीत जास्त 10 गुण मिळवेल. पण इंग्लंडचे विजय 5 असल्याने आणि श्रीलंकाचे विजय 4 असल्याने इंग्लंड विजयी सामन्यांच्या तुलनेत उपांत्य फेरीत प्रवेश करेल. तसेच पाकिस्तान आणि बांगलादेश जास्तीत जास्त केवळ 9 गुण मिळवू शकतात.

तसेच जर इंग्लंडने भारत आणि न्यूझीलंड दोन्ही संघांविरुद्ध पराभव स्विकारले तरी ते उपांत्य फेरीत प्रवेश करु शकतात पण त्यांना पुढील समीकरणांवर अवलंबून रहावे लागेल. ती समिकरणे अशी

– बांगलादेशने त्यांचे उर्वरित दोन्ही सामन्यात (भारत आणि पाकिस्तान विरुद्ध) पराभूत व्हावे. ज्यामुळे त्यांचे 7 गुण होतील

-पाकिस्तानने त्यांचे न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान विरुद्धचे सामने पराभूत व्हावे. त्यानुसार पाकिस्तानचे 7 गुण होतील.

– श्रीलंकेने त्यांच्या उर्वरित तीन सामन्यांपैकी कमीत कमी दोन सामन्यात पराभूत व्हावे. ज्यामुळे त्यांचे 8 गुण होतील आणि विजयी सामन्यांच्या तुलनेत इंग्लंड उपांत्य फेरीत प्रवेश करेल.

-विंडीजने त्यांच्या उर्वरित तीन सामन्यांपैकी एका सामन्यात पराभूत व्हावे. ज्यामुळे त्यांचे जास्तीत जास्त 7 गुण होतील.

बांगलादेश – बांगलादेश संघाने मोठ्या संघांना चांगली टक्कर दिली आहे. त्यांचे आता भारत आणि पाकिस्तान विरुद्ध उर्वरित सामने बाकी आहेत. जर त्यांनी हे दोन्ही सामने जिंकले तर त्यांचे 11 गुण होती. पण याबरोबरच त्यांना अन्य संघांच्या निकालांवर अवलंबून रहावे लागणार आहे. दोन्ही सामने जिंकल्यानंतर बांगलादेशसाठी अशी असतील समीकरणे –

– इंग्लंडने एक तरी सामना पराभूत व्हावा. ज्यामुळे त्यांचे 10 पेक्षा अधिक गुण होणार नाही. किंवा भारताने उर्वरित सर्व सामने पराभूत व्हावे.

– श्रीलंकेने त्यांच्या उर्वरित 3 सामन्यांपैकी 1 सामन्यात तरी पराभूत व्हावे. ज्यामुळे त्याचे जास्तीत जास्त 10 गुण होतील.

पण जर बांगलादेशला एकच विजय मिळवता आला तरी त्यांना गणितीय सुत्रांनुसार उपांत्य फेरीसाठी पात्र ठरण्याची संधी आहे. पण त्यांच्यासाठी त्यांचा निगेटिव्ह नेट रनरेट मारक ठरेल.

श्रीलंका – श्रीलंकेने इंग्लंड विरुद्ध विजय मिळवून सर्वांना आश्चर्यचकित केले होते. श्रीलंकाचे सध्या 6 गुण आहेत. तसेच त्यांचे उर्वरित तीन सामने भारत, विंडीज आणि दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध होणार आहेत. त्यांना स्पर्धीतील त्यांचे आव्हान कायम ठेवण्यासाठी पुढील समीकरणांचे आव्हान असेल –

– श्रीलंकेने जर उर्वरित तीनही सामने जिंकले तर त्यांना केवळ इंग्लंडने एका सामन्यात पराभूत व्हावे अशी आशा असेल.

– श्रीलंकेने जर उर्वरित 3 सामन्यांपैकी 2 सामने जिंकले तर त्यांना इंग्लंडने त्यांचे दोन्ही सामने पराभूत व्हावे, तसेच बांगलादेश आणि पाकिस्तानने कमीत कमी एका सामन्यात पराभूत व्हावे, अशी आशा करावी लागेल.

-जर श्रीलंकेने उर्वरित 3 सामन्यांपैकी 2 सामन्यात पराभव स्विकारला तर त्यांचे आव्हान संपुष्टात येईल.

पाकिस्तान – यजमान इंग्लंडला पराभवाचा धक्का देत पाकिस्तानने या विश्वचषकातील पहिला विजय मिळवला होता. त्यांचे सध्या 5 गुण आहेत. तसेच त्यांचे अजून साखळी फेरीत 3 सामने बाकी आहेत. जर त्यांनी त्यांचे तीनही सामने जिंकले तर त्यांचे 11 गुण होतील.

पण याबरोबरच त्यांची अशी आशा असेल की इंग्लंडने किमान एक सामना पराभूत व्हावा, किंवा भारत आणि न्यूझीलंडने त्यांचे उर्वरित सर्व सामने पराभूत व्हावे.

विंडीज – विंडीजने या विश्वचषकाची चांगली सुरुवात केली होती. परंतू त्यानंतर त्यांनी विजयाची लय गमावली. त्यांचे सध्या गुणतालिकेत केवळ 3 गुण आहेत. तसेच त्यांचे अजून साखळी फेरीत 3 सामने उरले आहेत. त्यांना त्यांचे आव्हान कायम ठेवण्यासाठी या सर्व सामन्यात विजय आवश्यक आहे.

त्यांनी एका जरी सामन्यात पराभव स्विकारला तर त्यांचे आव्हान संपुष्टात येईल. पण जर त्यांनी त्यांचे उर्वरित सामने (भारत, श्रीलंका आणि अफगाणिस्तान विरुद्ध) सर्व सामने जिंकले तरी त्यांना अन्य संघांच्या निकालावर अवलंबून रहावे लागेल.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड सामन्यानंतरची गुणतालिका –

Screengrab: cricketworldcup.com

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

टीकाकारांचा धनी ठरलेल्या धोनीच्या मदतीला आला त्याचाच पहिला कर्णधार

३६ वर्षांपुर्वी कपिल देवच्या टीम इंडियाने करोडो भारतीयांची स्वप्ने पुर्ण केली होती

भुवनेश्वर कुमार करतोय नेटमध्ये गोलंदाजी; भारतीय संघाला मोठा दिलासा, पहा व्हिडिओ