डू प्लेसिस, डिव्हिलियर्स पाठोपाठ हा खेळाडूही दुखापतीमुळे संघाबाहेर

दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंना सध्या दुखापतींनी घेरले आहे. त्यातच त्यांचे एबी डिव्हिलियर्स आणि फाफ डूप्लेसिस हे प्रमुख खेळाडूही आधीच दुखापतीमुळे संघाबाहेर गेले आहेत. आता त्यांच्या पाठोपाठ क्विंटॉन डिकॉक हा फलंदाजही मनगटाच्या दुखापतीमुळे भारताबरोबर सुरु असलेल्या वनडे मालिकेतून बाहेर पडला आहे.

यष्टीरक्षक फलंदाज डिकॉकला काल भारताविरुद्ध पार पडलेल्या दुसऱ्या वनडेच्या दरम्यान ही दुखापत झाली आहे. त्याला या दुखापतीतून बाहेर येण्यासाठी २ ते ४ आठवड्याचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे तो वनडे मालिकेबरोबरच १८ फेब्रुवारी पासून भारताविरुद्धच सुरु होणाऱ्या टी २० मालिकेसाठीही उपलब्ध नसेल.

त्याच्या या दुखापतीबद्दल दक्षिण आफ्रिका संघाचे मॅनेजर डॉ. मोहम्मद मुसाजी यांनी सांगितले की “डिकॉकला रविवारी दुसऱ्या वनडेत फलंदाजी दरम्यान मनगटाला दुखापत झाली. यामुळे त्याला अस्वस्थता आणि वेदना जाणवत होत्या. त्याच्या पुढच्या तपासणीनंतर असे लक्षात आले आहे की त्याला त्या ठिकाणी जखम झाली आहे आणि त्याभोवती सूज आली आहे. या प्रकारच्या दुखापतीतून बाहेर येण्यासाठी २ ते ४ आठवड्यांचा कालावधी लागतो. त्यामुळे त्याला भारताविरुद्ध चालू असलेल्या वनडे मालिका आणि त्यानंतर होणाऱ्या टी २० मालिकेतून बाहेर पडावे लागले आहे. दक्षिण आफ्रिकेची वैद्यकीय टीम त्याला पुढच्या महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी बरे करण्याचा प्रयत्न करेल.”

डिकॉकने पहिल्या दोन्ही वनडेमध्ये विशेष काही केले नाही. तसेच त्याने वनडे मालिकेआधी पार पडलेल्या कसोटी मालिकेतही सहा डावात मिळून फक्त ७१ धावा केल्या होत्या. या सहा डावांमध्ये ४३ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या होती, तसेच तो या कसोटी मालिकेत दोनदा शून्य धावेवरही बाद झाला होता.

डिकॉकप्रमाणे डू प्लेसिसही भारताविरुद्धच्या वनडे आणि टी २० मालिकेतून बाहेर पडला आहे. त्यामुळे संघाचे कर्णधारपद २३ वर्षीय एडिन मार्करमकडे देण्यात आले आहे. तसेच डिव्हिलियर्स पहिल्या ३ वनडेसाठी दुखापतीमुळे उपलब्ध नव्हता; पण तो चौथ्या वनडेत दक्षिण आफ्रिका संघात परत येईल.

सध्या भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ६ सामन्यांच्या वनडे मालिकेत २-० असा आघाडीवर आहे. भारताने पहिल्या दोन्हीही वनडे सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय मिळवला होता. यापुढील तिसरा वनडे सामना ७ फेब्रुवारीला केपटाउन येथे होणार आहे.