या क्रिकेटपटूला मिळाली एकाच दिवशी चांगली आणि वाईट बातमी

आज आयसीसीने कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारीत काल दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात पार पडलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यानंतर काही खेळाडूंच्या क्रमवारीत मोठे बदल झाले आहेत.

दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाने गोलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थान मिळवताना कसोटी कारकिर्दीतील सर्वोत्तम रेटिंग पॉईंट्स मिळवले आहेत. त्याचे आत्ताचे रेटिंग पॉईंट्स ९०२ आहेत.

त्याने दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात झालेल्या दुसऱ्या कसोटीत पहिल्या डावात ९६ धावात ५ विकेट्स आणि दुसऱ्या डावात ५४ धावात ६ विकेट्स असे एकूण १५० धावात ११ विकेट्स घेतल्या.याच कामगिरीच्या जोरावर त्याने आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान मिळवले आहे.

पण या आधीच आयसीसीने रबाडावर दोन कसोटी सामन्यांची बंदी घातली आहे. त्याने दुसऱ्या कसोटी सामन्या दरम्यान ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथशी गैरवर्तणूक केली होती. यामुळे आयसीसीच्या आचारसंहितेखाली त्याच्यावर ही बंदी घालण्यात आली आहे.

रबाडाने आजपर्यंत २८ कसोटी सामने खेळले असून यात त्याने २१.४५ च्या सरासरीने १३५ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच त्याने आजपर्यंत ४ वेळा एका कसोटी सामन्यात १० पेक्षा जास्त विकेट्स घेण्याचीही कामगिरी केली आहे. अशी कामगिरी दक्षिण आफ्रिकेकडून फक्त डेल स्टेनने केली आहे.

त्याचबरोबर त्याचा संघ सहकारी एबी डिव्हिलियर्सनेही फलंदाजी क्रमवारीत पुन्हा एकदा पहिल्या १० फलंदाजांमध्ये स्थान मिळवले आहे. त्याने ५ स्थानांची प्रगती करत सातवे स्थान मिळवले आहे.