Australian Open 2018: राफेल नदालचा दुसऱ्या फेरीत प्रवेश

स्पॅनिश टेनिस स्टार राफेल नदालने ऑस्ट्रलियन ओपन ग्रँड स्लॅम स्पर्धेत विजयी सुरुवात केली आहे. त्याने पहिल्या फेरीत डोमिनिकन रिपब्लीकच्या व्हिक्टर एस्ट्रेला बर्गोसचे आव्हान ६-१,६-१,६-१ असे सहज मोडून काढले.

नदालने याआधी नोव्हेंबर २०१७ मध्ये झालेल्या एटीपी वर्ल्ड टूर फायनल स्पर्धेतूनही गुढगा दुखापतीमुळे माघार घेतली होती. परंतु त्याने आज व्हिक्टर एस्ट्रेला बर्गोस विरुद्ध १ तास ३४ मिनिटे चाललेल्या लढतीत विजय मिळवून पुन्हा एकदा पुनरागमन केले आहे.

नदालने या सामन्यात व्हिक्टर एस्ट्रेला बर्गोसला जिंकण्याची कोणतीही संधी दिली नाही. ऑस्ट्रेलियन ओपन २०१७ च्या उपविजेता नदाल आजच्या विजयाबद्दल म्हणाला, “विजयी सुरवातीमुळे आनंदी आहे.”

“हि चांगल्या विजयाबरोबर एक सकारात्मक सुरुवात आहे. जर मी मागील काही महिनांपासून टेनिस सामने खेळलेले नाही, त्यामुळे हे थोडे अवघड होते. पण मी सकारात्मक विचारातून सुरुवात केली. हीच गोष्ट माझ्यासाठी महत्वाची आहे.”

याबरोबरच त्याने आपल्यात आणखी सुधारणा करण्याची गरज आहे असेही सांगितले.

नदालचा पुढच्या फेरीतील सामना ५२ क्रमांकावर असणाऱ्या अर्जेंटिनाच्या लिओनार्डो मेयरशी होणार आहे.