राफेल नदालची अंतिम सामन्यात धडक!

यावर्षीचा फ्रेंच आणि अमेरिका ओपन विजेता राफेल नदालने यावर्षीच्या चायना ओपनच्या अंतिम सामन्यात धडक मारली आहे. त्याने २०१७ मधील त्याचा ५९ वा सामना जिंकत चौथ्यांदा चायना ओपनचा अंतिम सामना गाठला आहे.

राफेल नदालने उपांत्य फेरीत ग्रिगोर डिमिट्रोवला ६-३,४-६,६-१ ने हरवले आहे.

राफेल नदालचे उपांत्य सामन्यात खेळावर सुरवातीपासूनच नियंत्रण होते. त्याने सलग १३ गुण त्याच्या सर्व्हिसवर मिळवले. हि सर्विस राखत त्याने डिमिट्रोवची सर्व्हिस ब्रेक केली.

नदालने दुसऱ्या फेरीतही ३-१ असे आपले वर्चस्व राखले होते परंतु आठव्या मानांकित डिमिट्रोवने ४-४ अशी बरोबरी साधत ही फेरी ४-६ अशी जिंकली. परंतु तिसऱ्या फेरीत अग्रमानांकित राफेल नदालने डिमिट्रोवला संधी न देता ६-१ ने ही फेरी जिंकत यावर्षीच्या ९ व्या अंतिम सामन्यात धडाक्यात प्रवेश केला.

आता निक कॅर्गोईस आणि अलेक्झांडर झवेरव यांच्यात दुसरा उपांत्य सामना रंगेल. यांच्यात जो जिंकेल त्याच्या बरोबर नदाल रविवारी अंतिम सामना खेळेल. याआधी नदाल २००५ मध्ये चायना ओपन जिंकला होता.