नदाल, फेडररची शांघाय ओपनच्या उपांत्य फेरीत धडक

शांघाय। टेनिस क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या राफेल नदाल आणि त्याच्या पाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या रॉजर फेडरर यांनी शांघाय ओपन स्पर्धेत आज उपांत्य सामन्यात धडक मारली आहे.

या वर्षीचा फ्रेंच आणि अमेरिका ओपन जिंकणारा राफेल नदालने आज ग्रिगोर डिमिट्रोवला हरवून शांघाय ओपनच्या उपांत्य सामन्यात प्रवेश केला. पहिला सेट नदालने सहज जिंकला परंतु डिमिट्रोवने पुनरागमन करत दुसऱ्या सेटमध्ये नदालला चांगली लढाई देत सेट जिंकला. तिसऱ्या सेटमध्ये मात्र नदालने डिमिट्रोवला संधी न देता सामनाही ६-४, ६-७,६-३ असा जिंकला.

त्याच बरोबर दिग्गज रॉजर फेडररनेही उपांत्य सामन्यात प्रवेश केला आहे. त्याने आज गॅस्क्वेटला हरवले. गॅस्क्वेटने पहिल्या सेटमध्ये चांगली लढत दिली होती परंतु त्याला सेट जिंकता आला नाही पुढच्या सेट मात्र फेडररने सहज जिंकत सामना ५-७, ४-६ असा जिंकला.

आज उपांत्य सामन्यात नदालची गाठ चौथ्या क्रमांकावर असणाऱ्या मारिन सिलिकशी तर रॉजर फेडररची १६ व्या क्रमांकावर असणाऱ्या जुआन मार्टिन देल पेट्रोशी पडेल.

मारिन सिलिकने आज अल्बर्ट रामोस विनोलासला ६-३,६-४ असे तर जुआन मार्टिन देल पेट्रोने ट्रॉइकीला ६-४,१-६, ४-६ असे हरवत उपांत्य सामन्यात प्रवेश
केला आहे.

या सामन्यातून यावर्षी कायम असलेला नदाल आणि फेडररचा दबदबा पुन्हा एकदा दिसून आला.