असे काय झाले ज्यामुळे राहुल द्रविड नाही होऊ शकला टीम इंडियाचा फलंदाजी मार्गदर्शक

भारतीय संघाला सध्या सुरु असलेल्या इंग्लंड विरुद्धच्या कसोटीमालिकेत अपयशाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

भारताला यावर्षी दक्षिण आफ्रिकेतही कसोटी मालिकेत पराभवाला सामोरे जावे लागले होते. तसेच इंग्लंड विरुद्धच्या कसोची मालिकेत भारत 1-3 अशा फरकाने पिछाडीवर आहे.

त्यामुळे प्रशिक्षक रवी शास्त्री आणि भारताचा सपोर्ट स्टाफवर टीका होत असतानाच भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने मोठा खुलासा केला आहे.

जेव्हा शास्त्री यांची भारतीय संघाच्या प्रशिक्षक पदी नियुक्तीच्या वेळी सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा समावेश असणाऱ्या सल्लागार समीतीने भारतीय संघ जेव्हा परदेश दौऱ्यावर जाईल तेव्हा राहुल द्रविड  फलंदाजी तर जहिर खान गोलंदाजी मार्गदर्शक असेल असे जाहिर केले होते.

पण त्यानंतर संजय बांगर आणि भारत अरुण यांची अनुक्रमे फलंदाजी आणि गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून निवड झाली.

याविषयी इंडिया टीव्हीशी बोलताना गांगुली म्हणाला, त्याला माहित नाही की सल्लागार समितीने द्रविडला जेव्हा मार्गदर्शक म्हणून घोषित केले होते तेव्हा नंतर त्याला ते पद न देण्याचे कारण काय.

त्याचबरोबर गांगुलीने असेही सांगितले की सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या समीतीने प्रशिक्षक नियुक्तीच्यावेळी आणखी गोंधळ वाढवला. ज्यामुळे या प्रक्रियेतून सल्लागार समितीने माघार घेतली.

तो म्हणाला “राहुल द्रविडला पहिल्यांदा फलंदाजी मार्गदर्शकासाठी विचारण्यात आले होते, ज्यासाठी तो तयारही झाला होता. पण त्यानंतर तो रवी शास्त्रींशी बोलला आणि मला माहित नाही नंतर काय झाले. ”

“सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या समीतीने प्रशिक्षक नियुक्ती करताना आणखी गोंधळ वाढवला. आम्ही त्यातून नंतर बाहेर पडलो. त्यामुळे मला राहुल द्रविड फलंदाजी मार्गदर्शक का बनला नाही हे सांगणे अवघड आहे.”

“पण जर रवी शास्त्रींना विराट कोहलीशी चर्चा करुन जबाबदारी दिली आहे. तर ती त्यांनी पार पूर्ण केली पाहिजे आणि संघाची कामगिरी सुधारली पाहिजे.”

त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या समीतीचे अध्यक्ष विनोद राय यांनी स्पष्ट केले की त्यांना राहुल द्रविड आणि झहिर खान यांच्या नियुक्तीबद्दल काहीही माहिती नव्हते. तसेच सल्लागार समितीला फक्त प्रमुख प्रशिक्षकाची नियुक्ती करण्यास सांगण्यात आले होते.

राय यांनी सांगितले की “अनिल कुंबळेचा एक वर्षाचा करार होता. ज्याचे पुढे नुतनीकरण किंवा जो पुढे वाढवला गेला नाही. जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या समीतीने कामकाज हाती घेतले तेव्हा आम्हाला एक महिन्यानंतर कळाले की त्याचा करार संपला आहे. त्यामुळे आम्ही नियमांचे पालन केले आणि त्यापदाची नियुक्तीविषयी विचार केला.”

“कल्पना अशी होती की सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा समावेश असणारी सल्लागार समिती प्रमुख प्रशिक्षकाची नियुक्ती करेल. तुम्हाला या प्रक्रियेत पारदर्शकता आवश्यक असते.”

“सल्लागार समिती ही एक काम सोपवलेली समिती आहे आणि त्यांनी त्यांना जे योग्य वाटेल ते केले. तसेच त्याचे बाहेर पडणे हे धक्कादायक नव्हते कारण त्याचा करार एक वर्षाचाच होता. आम्ही द्रविड आणि झहिर बद्दल कोणतेही विधान केले नाही. आमचे काम प्रक्रियेप्रमाणे मुख्य प्रशिक्षकाची नियुक्ती करणे हे होते.”

रवी शास्त्री यांचा प्रशिक्षकापदाचा करार हा 2019 चा विश्वचषकापर्यंत आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

आशियाई सुवर्णपदक विजेत्या निरज चोप्राच्या त्या कृत्याबद्दल काय म्हणाले भारतीय लष्कर दलप्रमुख?

शुटींग वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये १६ वर्षीय सौरभ चौधरीचा सुवर्णवेध

‘निवड समितीचा दुजाभाव’ हरभजन सिंगची टीका