अखेर राहुल द्रविडने २००३ विश्वचषक पराभवाचा वचपा काढला

आज १९ वर्षांखालील विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ आमने सामने आले होते. या सामन्यात भारताने ८ विकेट्सने विजय मिळवून चौथ्यांदा १९ वर्षांखालील विश्वचषकावर आपले नाव कोरले आहे.

या विजयाबरोबरच भारताने सर्वाधिक वेळा १९ वर्षांखालील विश्वचषक जिंकण्याचाही विक्रम केला आहे. पण या भारतीय संघाचा प्रशिक्षक असणाऱ्या राहुल द्रविडसाठी मात्र हा विजय वेगळ्या अर्थाने आनंद देऊन जाणारा आहे.

२००३ साली वरिष्ठ गटाच्या विश्वचषकात भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया असाच अंतिम सामना रंगला होता. या सामन्यात भारताने तब्बल १२५ धावांनी पराभव स्वीकारला होता. त्यावेळी राहुल द्रविड हा भारतीय संघातील प्रमुख खेळाडूंपैकी एक होता. त्याने या सामन्यात खेळताना ४७ धावा केल्या होत्या. त्यावेळी भारताच्या डावातील ही दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक वयक्तिक धावसंख्या होती.

या विश्वचषकाच्या वेळी जेव्हा भारत पराभूत झाला तेव्हा द्रविड खूप नाराज झाला होता. त्यामुळेच आजचा हा १९ वर्षांखालील भारतीय संघाचा विजय आणि तोही ऑस्ट्रेलियाविरुद्ध असल्याने द्रविडसाठी खास असेल.

२००३ च्या विश्वचषकानंतर द्रविडकडे भारतीय संघाचे कर्णधारपदही सोपवण्यात आले होते. द्रविडने क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या नंतर १९ वर्षांखालील भारतीय संघाचे २०१५ ला प्रशिक्षकपद स्वीकारले. त्याच्या मार्गदर्शनाखाली या भारतीय संघाने उत्तम कामगिरी केली. भारतीय संघाच्या या यशात प्रशिक्षक म्हणून द्रविडचा खूप मोठा वाटा आहे.