पाऊस सुरु झाला आणि तमाम क्रिकेटप्रेमींना २००३च्या क्रिकेट विश्वचषकाची आठवण झाली

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया १९ वर्षाखालील क्रिकेट विश्वचषकात ऑस्ट्रेलियाने भारतासमोर २१७ धावांचे लक्ष ठेवले आहे. भारतीय संघाने या लक्षाचा पाठलाग करताना ४ षटकांत बिनबाद २३ धावा केल्या आहेत.

असे असले तरीही पावसामुळे खेळ थांबवण्यात आला आहे. पृथ्वी शॉ १० तर मनजोत कार्ला ९ धावांवर खेळत आहेत.

पाऊस सुरु झाल्यामुळे मात्र २००३ साली झालेल्या ५० षटकांच्या क्रिकेट विश्वचषकाची आठवण क्रिकेटप्रेमींना झाली आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने प्रथम फलंदाजी करताना ३५९ धावांचा डोंगर उभा केला होता. त्यानंतर भारताचा डाव सुरु झाला तेव्हा मध्येच पाऊस आला आहे.

भारत तो सामना तब्बल १२५ धावांनी पराभूत झाला होता. त्या विश्वचषकात राहुल द्रविड हा भारतीय संघातील एक प्रमुख खेळाडू होता. आज तोच द्रविड भारतीय संघाचा प्रशिक्षक आहे. त्यामुळे तेव्हाच वचपा काढण्याची त्याला मोठी संधी आहे. 

आजपर्यंत क्रिकेट विश्वचषकात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात २००३ मध्ये वरिष्ठ गटात, २००५ मध्ये महिला विश्वचषकात तर २०१२ मध्ये १९ वर्षाखालील विश्वचषकात अंतिम सामना झाला आहे. त्यात २००३ आणि २००५ मध्ये भारताला पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

२००३मध्ये भारतीय संघाचा कर्णधार म्हणून सौरव गांगुली, २००५ला महिला विश्वचषकात मिताली राज तर २०१२ उन्मुक्त चंद हा कर्णधार होता.