जंगी स्वागतासाठी व्हा तयार! पृथ्वी शॉची टीम इंडिया येतेय मायदेशी परत

काल १९ वर्षांखालील विश्वचषक भारतीय संघाने जिंकला आणि त्याचे सर्वच स्थरातून कौतुक झाले. या विश्वचषक विजयाबरोबर भारताने सर्वाधिक वेळा १९ वर्षांखालील विश्वचषक जिंकण्याचाही मोठा विक्रम केला आहे.

आता हा विश्वचषक मायदेशी घेऊन येण्यासाठी हे युवा खेळाडू परतीच्या प्रवासाला निघाले आहेत. याबद्दल आयसीसीसीने ट्विटवरून माहिती दिली आहे. आयसीसीने ट्विटमध्ये म्हटले आहे की “राहुल द्रविड आणि त्याचा १९ वर्षांखालील विश्वविजेता संघ भारतात परतण्यासाठी मोठ्या प्रवासाला निघाला आहे.”

या संपूर्ण स्पर्धेत भारतीय संघाने अपराजित राहण्याचाही मोठी कामगिरी केली. या यशाचे मोठे श्रेय जाते ते या संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविडला. त्याने या खेळाडूंचे लक्ष विचलित होणार नाही आणि त्यांचे लक्ष खेळावरच केंद्रित राहील याला जास्त महत्व दिले. त्यामुळेच पृथ्वी शॉच्या टीम इंडिया बरोबरच राहुल द्रविडवरही कौतुकाचा वर्षाव झाला.

या स्पर्धेत शुभमन गिल, पृथ्वी शॉ, कमलेश नागरकोटी, अनुकूल रॉय, ईशान पोरेल असे खेळाडू चांगलेच चमकले. शुभमन गिल सर्वाधिक धावा करणारा तर अनुकूल रॉय सर्वाधिक बळी घेणारा खेळाडू ठरले.