द्रविडचा साधेपणा पुन्हा चर्चेत, प्रेक्षकांमध्ये बसुन पाहिला आयपीएलचा सामना

बंगळूरू। काल एम चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरूद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात झालेल्या सामन्यात पावसामुळे काहीवेळ व्यत्यय आला होता.

त्याचवेळी अचानक एका प्रेक्षकांमध्ये बसलेल्या खेळाडूवर कॅमेराचा फोकस करण्यात आला आणि अचानक स्टेडियममध्ये अचानक एकच जल्लोष झाला. तो खेळाडू होता भारताच्या 19 वर्षांखालील संघाचा प्रशिक्षक आणि भारतीय संघाचा माजी कर्णधार राहुल द्रविड.

आयपीएलमध्ये नेहमीच सेलिब्रीटी व्हीआयपी विभागात बसून सामन्याची मजा घेताना दिसतात, पण द्रविडने सामान्य प्रेक्षकांमध्ये बसून सामना बघणे पसंत केले.

द्रविडबरोबर त्याची पत्नी आणि त्याचा मुलगाही सामना पहाण्यासाठी उपस्थित होते. याचा व्हिडिओ आयपीएलच्या ट्विटर अकाउंटवरून शेयर करण्यात आला आहे.

जेव्हा प्रेक्षकांच्या लक्षात आले की द्रविडही येथे आहे तेव्हा त्यांनी त्याच्यासोबत सेल्फी काढले.

या सामन्यात खेळत असलेल्या 19 वर्षांखालील संघातील शिवम मावी आणि शुभमन गिल या खेळाडूंची कामगिरी पाहून द्रविडला नक्कीच आनंद झाला असेल. हा सामना कोलकताने 6 विकेट्सने जिंकला.

द्रविडने याआधी आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर प्रतिनिधित्व केले आहे. तसेच तो दिल्ली डेयरडेव्हिल्सचा काही काळासाठी प्रशिक्षकही होता.