जेव्हा द्रविड मास्तरांनी सांगितले फोन ‘स्विच ऑफ’ करायला!

१९ वर्षांखालील भारतीय संघाने न्यूझीलंडमध्ये सुरु असलेल्या विश्वचषकात अभिमान वाटेल अशी कामगिरी केलेली आहे. या कामगिरीमुळे या संघाने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. पण त्यांच्या या उत्तम कामगिरीच्या मागे महत्वाचा वाटा आहे तर तो प्रशिक्षक राहुल द्रविडचा.

द्रविडने या तरुण खेळाडूंकडून चांगली तयारी करून घेतली आहे. या खेळाडूंचे लक्ष भरकटणार नाही आणि त्यांनी सध्या फक्त क्रिकेटचा विचार करावा याकडे द्रविड विशेष लक्ष देत आहे. त्याचमुळे विश्वचषकाच्या उपांत्य सामन्याच्या आधीपासून ते अंतिम सामन्यापर्यंत १९ वर्षांखालील भारताच्या खेळाडूंना त्याने फोन बंद ठेवायाला सांगितले आहेत.

याविषयी शिवम मावीचे वडिल पंकज मावी यांनी स्पोर्ट्सवाल्लाहशी बोलताना माहिती दिली. पंकज यांना शिवमची उपांत्य सामन्यात पाकिस्तानवर विजय मिळवल्यानंतरची प्रतिक्रिया काय होती असे विचारण्यात आले होते. त्यावर त्यांनी सांगितले, “आमचे त्याच्याशी बोलणे झालेले नाही. आम्ही त्याच्याशी रविवारी शेवटचे पण बऱ्याच वेळ बोललो. त्यावेळी त्याने सांगितले की तो उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीपर्यंत बोलू शकत नाही. कारण कुटुंबाचे आणि मीडियाच्या कॉलमुळे त्यांचे लक्ष विचलित होऊ शकते. म्हणून प्रशिक्षक राहुल द्रविडने सर्व खेळाडूंना त्यांचे फोन बंद करायला सांगितले आहेत.”

द्रविडने आयपीएल लिलावाच्या आधीही या खेळाडूंशी चर्चा करून आयपीएल दरवर्षी येते विश्वचषकात खेळण्याची संधी दरवर्षी मिळत नाही असे सांगत क्रिकेटकडेच लक्ष देण्यास सांगितले होते. त्याच्या या उत्तम मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने चांगली कामगिरी करत विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. आज ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारताचा अंतिम सामना सुरु आहे.

याआधीही २०१६ च्या १९ वर्षांखालील विश्वचषकात द्रविडच्याच मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने अंतिम सामन्यात प्रवेश केला होता. पण त्यांना विंडीज संघाकडून पराभव स्वीकारावा लागला होता.