अति १९ वर्षाखालील क्रिकेट धोकादायक: राहुल द्रविड

भारताचा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड जो की भारताच्या १९ वर्षांखालील संघाचाआणि भारत अ संघाचा प्रशिक्षक आहे, त्याने असे वक्तव्य केले आहे की जास्त १९ वर्षाखालील क्रिकेट धोकादायक असू शकते.

एकोणीस वर्षाखालील भारतीय संघातील स्टार फलंदाज पृथ्वी शॉ याला नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या १९ वर्षाखालील एशिया कप’मधून वगळण्यात आले आहे. त्याला वगळण्याचे प्रमुख कारण रणजी क्रिकेटमध्ये त्याचा समावेश करणे आहे.

१७ वर्षाच्या पृथ्वी शॉ’ने त्याच्या क्रिकेट आयुष्याला उत्तम सुरुवात केली आहे. त्याने ४ प्रथम श्रेणी सामन्यात ३ शतके केली आहेत. फेब्रुवारी महिन्यात त्याने प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. याच आठवड्यात त्याने तामिळनाडू विरुद्ध मुंबई कडून खेळताना १२३ धावांची खेळी केली.

एवढ्या चांगल्या कामगिरीनंतरसुद्धा पृथ्वीला नोव्हेंबरमध्ये होणाऱया आशिया चषकात भारतीय संघात स्थान देण्यात आलेले नाही. हा एक धक्कादायक निर्णय होता पण त्यानंतर राहुल द्रविडने स्पष्टीकरण देताना सांगितले की संघ व्यवस्थापनाला जानेवारीत होणाऱ्या विश्वचषकासाठी पृथ्वी संघात हवाच आहे.

“वयोगटातील क्रिकेटमुळे बरेच प्रतिभावान खेळाडू पुढे येतात, पण त्याला काही मर्यादा आहेत. त्यातून पुढे जाऊन त्यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायचे असते म्हणूनच आम्ही पृथ्वीबरोबर हा निर्णय घेतला आहे.” असे द्रविड म्हणाला.