Blog: राहुल द्रविड- नम्रतेचा महामेरू बहुत जनांसी आधारु

– पराग पुजारी

एखाद्या माणसाबद्दलच्या आपल्या मनातल्या आदराला पण एक लिमिट असते. त्या लिमिटच्या बाहेर तो अगदी बियॉन्ड म्हणतात तसा जाऊ लागला की त्याला संत म्हणावं का असं वाटू लागतं. अंडर १९ वर्ल्डकप जिंकल्यावर बीसीसीआयने कोच राहुल द्रविडला ५० लाख, खेळाडूंना ३० लाख आणि सपोर्ट स्टाफला २० लाख पारितोषिक जाहीर केले. फुकट ते पौष्टिक असा अलिखित नियम असणाऱ्या देशात तर चौदा महिन्यांची मेहनत फळाला आल्यानंतर सर्व युनिटला असे भरघोस बक्षीस मिळाल्यावर द्रविडने खरंतर त्याला मिळालं ते बक्षीस घेऊन खुश व्हायला हवे होते. पण आता तो म्हणतोय की ‘सर्व अटेन्शन मला मिळतंय हे मला जरा खटकतंय, आम्ही सर्वानीच एकसारखी मेहनत केलीये आणि मला ५० लाख व इतरांना माझ्यापेक्षा कमी असा भेदभाव का? सर्वाना समान का नाही?’

हेच ते, इतरांना आपल्यापेक्षा कमी मिळतेय म्हटलं की हा माणूस अस्वस्थ होतो, प्रश्न विचारतो. हर्षा भोगलेने एकदा राहुलच्या ग्रेट इनिंग्जविषयी त्याला बोलतं केलं तेव्हा राहुल त्या त्या सामन्यात दुसऱ्याही काही खेळाडूंचा कसा मोलाचा वाटा होता हे सांगत राहिला. त्यावर हर्षा जे म्हणाला होता त्याची प्रचिती आत्ताही येते – ‘धिस इज राहुल द्रविड फॉर यू गाइज.. यू टेल हिम ही प्लेड वेल अँड ही विल टेल यू समवन एल्स ऑल्सो प्लेड इकवली वेल’.

आत्ताही त्याने हेच केलंय. दुसरेही तितकीच मेहनत घेतात हे माहित असलेल्या राहुलचा हा स्वभाव आपल्याला नवा नाही. मध्यंतरी बेंगलोर विद्यापीठाने आणि त्यापूर्वी गुलबर्गा विद्यापीठाने दिलेली डॉक्टरेट नम्रपणे नाकारणाऱ्या द्रविडला जेव्हा विचारलं गेलं की असं का केलंस? तेव्हा तो म्हणाला होता, ‘डॉक्टरेट मिळवण्यासाठी लोक बराच काळ खूप कष्ट घेतात हे मला माहितेय. माझ्या पत्नीनेही डॉक्टर होण्यासाठी मोठा कालावधी मेहनत घेतलीये, सगळेच डॉक्टर घेतात, तेच पीएचडीचं. अशावेळी मी यासाठी स्वत:ला हकदार मानत नाही जरी ती मानद पदवी असली तरी.. वाटल्यास पुढे स्वत: क्रीडा क्षेत्रात रिसर्च करून ही पदवी मिळवेन’.. त्या त्या क्षेत्रात मेहनत करूनच मिळवता येतील अशा काही गोष्टी असतात, त्या इतर क्षेत्रांतील लोकांना मानद म्हणून दिल्या की त्या खऱ्या मूळ क्षेत्रातील लोकांना काय वाटत असेल हा विचार फारसा कुणी करत बसत नाही. तेव्हा असं वाटतं की नियम हा अपवादाने सिद्ध होतो हेच मुळात सिद्ध होण्यासाठी नियतीने द्रविडची योजना करून ठेवलेली असावी.

या पीएचडीवरून अजून एक किस्सा आठवला. ज्यातून आपल्याला धोनी, रैना, इरफान, पियुष, आरपीसिंग, श्रीशांत वगैरे खेळाडू मिळाले, त्या टॅलेंट रिसोर्स डेव्हलपमेंट विंगची (TRDW) कल्पना बीसीसीआयला सुचवणाऱ्या ज्येष्ठ क्रीडा पत्रकार डॉ. मकरंद वायंगणकरानी वयाच्या ६६ व्या वर्षी मुंबई क्रिकेटवर पीएचडी करून मुंबई क्रिकेटवर आधारित ‘अ मिलियन ब्रोकन विन्डोज’ हे पुस्तक लिहिलेय, त्याच्या प्रकाशनाला मागच्या वर्षी गेलो होतो. कार्यक्रमाची रंगत वाढवण्यासाठी द्वारकानाथ संझगिरी, किरण मोरे, पारस म्हाम्ब्रे, अमोल मुजुमदार हेही मान्यवर होते. पण हे पीएचडीचे सांगताना त्यांनी आणखी एक उदाहरण दिले ते थक्क करणारे होते – राहुल द्रविडच्या आईने वयाच्या ५८ व्या वर्षी फाईन आर्ट्समध्ये पीएचडी केलीये. हे ऐकून वाटलं, काय बिशाद मग त्या नियतीची की अशा मातेचा मुलगा मेहनती, जिद्दी, चिकाटी असणार नाही आणि इतरांनी केलेल्या मेहनतीचा आदर करणार नाही. असे संस्कार घरातून असताना तो का काही फुकट घेईल? आणि डिझर्व्हिंग अशा इतरांना कमी मिळत असेल तर का गप्प बसेल? या अशा नम्रतेमागे, आपण कुणी स्पेशल नाही या वाटण्यामागे हा एक अंडरकरंटही असावा – राहुलसारख्यांची जडणघडण, त्यांच्यावर झालेले संस्कार, त्यांनी जवळून पाहिलेले जग, त्यांच्या भोवतालची माणसे या सगळ्याच गोष्टी त्यात येतात.

मुलाच्या सायन्स एक्झिबिशनसाठी शाळेत गेला की तो सहज रांगेत उभा राहतो. बिनधास्त रिक्षा, मेट्रोतून फिरतो. मग कुणीतरी त्याला ओळखून फोटो काढतो आणि ते फोटो व्हायरल होतात.

एम टीव्ही वाले त्याच्या रूममध्ये एका तरुण मुलीला पाठवून त्याचा बकरा करायला गेले, ती त्याच्याशी लगट करू लागली. तर या पठ्ठ्याने तिलाच उलट सुनावले की ‘तुझं शिक्षण पूर्ण होण्याचं वय आहे तर अभ्यासावर लक्ष दे, नीघ इथून’. बकरा करणाऱ्यांचाच बकरा झाला. (हा व्हिडिओही अनेकांनी यूट्यूबवर पाहिला असेलच.)

असेच एकदा त्याच्या घरी कुणी एक मुलगी घरातून पळून येऊन हटूनच बसली होती की ‘मला त्याच्याशी लग्नच करायचंय, त्याशिवाय मी जाणार नाही, आमचं लग्न लावून द्या.’ राहुलचे आईबाबा ताबडतोब धन्य झाले होते. पोलिसांना बोलवावं लागलं होतं. राहुलने नीट समजावून तिला परत पाठवलं. मुलींना तो आवडतोच. उगाच नाही ‘अगंबाई अरेच्चा’मध्ये संजय नार्वेकर पुस्तकात द्रविडचा फोटो ठेवून बसलेल्या त्याच्या बहिणीला म्हणत की ‘ गप अभ्यास कर.. म्हणे काय छान दिसतोय राहुल द्रविड!’

बोन मॅरो ट्रान्सप्लान्ट आणि किमोथेरपी सुरु असणाऱ्या अक्षय ढोके या द्रविडच्या एका तरुण फॅनला त्याच्या अखेरच्या दिवसात त्याच्या मित्रांनी एक सुखद भेट दिली होती. तो हॉस्पिटलमध्ये असताना द्रविडला व्हिडीओ कॉल करून त्याच्याशी त्याला बोलायला दिलं. राहुलने त्याची आत्मीयतेने चौकशी केली. अक्षयचे वडील त्याच्याशी मराठीत बोलू लागल्यावर राहुलही त्यांच्याशी मराठीत बोलू लागला. मध्येच मुलाला मांडीवर बसवून त्याच्याकडूनही अक्षयला गेट वेल सून म्हणवून घेतलं. मग तो लॅपटॉप त्या वॉर्डमध्ये फिरवला गेला तेव्हा राहुलने सर्वच पेशन्ट्सना हाय केलं आणि मग डॉक्टरांशीही बोलला. (हे मला Quora वरून समजलं होतं, त्यावर व्हिडीओ पाहिला होता जो यूट्यूबवरही आहे.)

तुम्ही ज्यांना फॉलो करता, ज्यांचे फॅन असता त्यांनी वागणुकीतून दिलेले धडेही आपसूक गिरवत राहण्याचा प्रयत्न करता, यातून तुम्हाला कधी फायदा होतो, कधी नुकसानही होते. तरीही आपण त्या मूल्यांपासून हटत नाही, तशी इच्छाच होत नाही. हे सगळं आपण शाळेच्या चार भिंतींबाहेरच शिकू शकतो.

द्रविडचा असा स्वभाव, तो असा का घडला हा स्वतंत्र पीएचडीचा विषय आहे.