ऑस्टेलिया दौऱ्यातील भारतीय संघाच्या विजयामागे राहुल द्रविड

सिडनी। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात सिडनी क्रिकेट ग्राउंडवर चौथा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात भारताकडून पहिल्या डावात चेतेश्वर पुजाराने 193 आणि रिषभ पंतने नाबाद 159 धावांची शतकी खेळी केली आहे. तसेच रविंद्र जडेजाने 81 आणि मयंक अगरवालने 77 धावांची अर्धशतकी खेळी केली आहे.

मयंक अगरवालचे हे सलग दुसऱ्या सामन्यातील अर्धशतक आहे. त्याने मेलबर्नमध्येही पहिल्या डावात 76 धावांची अर्धशतकी खेळी केली होती. त्याला या मालिकेसाठी दुखापतग्रस्त पृथ्वी शॉऐवजी भारतीय संघात स्थान देण्यात आले होते. त्यानेही या संधीचे सोने केले आहे.

त्याच्या या यशात भारताचा माजी दिग्गज फलंदाज राहुल द्रविडचे मोठे श्रेय असल्याचे मयंकने सांगितले आहे.

द्रविड हा 19 वर्षांखालील भारतीय संघाचा आणि भारत अ संघाचा प्रशिक्षक आहे. त्यामुळे अनेक युवा क्रिकेटपटू त्याच्या मार्गदर्शनाखाली घडत असून क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत आहेत. मयंकही भारत अ संघाकडून द्रविडच्या मार्गदर्शनाखाली खेळला आहे.

त्याबद्दल सांगताना मयंक म्हणाला, ‘त्याच्या मार्गदर्शनाखाली खेळणे खूप चांगले आहे. आम्ही फलंदाज आमच्या खेळाबद्दल आणि शैलीबद्दल त्याच्याशी खूप बोलतो. तोही आम्हाला मदत करण्यास मार्गदर्शन करण्यास तयार असतो. त्याचे सल्ले खूप मदत करणारे असतात.’

‘त्याने मला विशेषत: माझे मानसिक लक्ष्य केंद्रित कसे होईल याचा विचार करण्यास सांगितले होते. याच विषयी आम्ही चार ते सहा महिने बोलत होतो. त्याने मला त्या प्रवासात मदत केली आहे.’

राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली 19 वर्षांखालील भारतीय संघाने 2016 च्या विश्वचषकात उपविजेतेपद मिळवले होते. तर 2018 च्या विश्वचषकात विजेतेपद मिळवले आहे. विशेष म्हणजे सिडनी कसोटीत शतक करणारा रिषभ पंतचा 2016 च्या 19 वर्षांखालील विश्वचषकात भारतीय संंघात समावेश होता. त्यामुळे त्यालाही द्रविडचे मार्गदर्शन मिळाले आहे.

याबरोबरच पुजाराचीही फलंदाजी करताना मदत झाली असल्याचे सांगताना मयंक म्हणाला, ‘पुजारा फलंदाजी करत असताना तो ज्याप्रकारे गोलंदाजांचा सामना करतो, ते पाहणे मस्त आहे. त्याला त्याची शक्ती कशात आहे हे माहित आहे त्यामुळे तो खराब चेंडूची वाट पाहतो.’

‘नक्कीच त्याच्या अनुभवामुळे तो मला प्रतिस्पर्धी काय करणार आहे ते सांगत होता. पण मीच माझी विकेट फेकल्याने निराश झालो. मी जर ही चूक पून्हा केली नाही तर माझ्यासाठी ही चांगली शिकवण असेल.’

पुजारा आणि मयंकने भारताच्या पहिल्या डावात दुसऱ्या विकेटसाठी 116 धावांची भागीदारी केली होती.

महत्त्वाच्या बातम्या-

Video: रहाणेने घेतला अफलातून झेल; फलंदाजही झाला आश्चर्यचकित

ऑस्ट्रेलिया विरुद्ध ३ विकेट्स घेणाऱ्या कुलदीपसाठी ऑस्ट्रेलियाच्याच दिग्गजाचा सल्ला ठरला मोलाचा

कसोटीत केवळ ९ शतकं करणाऱ्या त्या फलंदाजाची सगळीच शतकं आहेत खास