मुलगा समितकडून ‘राहुल द्राविड’ला वाढदिवसाची खास भेट, केली १५० धावांची खणखणीत खेळी

बेंगलोर । भारतीय संघाचा माजी कर्णधार राहुल द्रविडचा मुलगा समित द्रविडने कर्नाटक क्रिकेट असोशिएशनने आयोजित केलेल्या बीटीआर अंडर १४ कपमध्ये १५० धावांची खेळी केली आहे. त्याच्या याच खेळीच्या जोरावर मल्ल्या अदिती इंटरनॅशनल स्कूलने विवेकानंद स्कूलचा ४१२ धावांनी पराभव केला.

विशेष म्हणजे याच सामन्यात समिती द्रविडच्या संघाकडून खेळत असलेल्या आर्यन जोशी या खेळाडूने १५४ धावांची खेळी केली. आर्यन माजी भारतीय क्रिकेटपटू सुनील जोशी यांचा मुलगा आहे. समित आणि आर्यनच्या टीमने ५० षटकांत ५ बाद ५०० धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना विवेकानंद स्कूलचा संघ ८८ धावांवर सर्वबाद झाला.

सुनील जोशी हे सध्या बांगलादेश संघाचे फिरकी गोलंदाज मार्गदर्शक म्हणून काम पाहतात तर राहुल द्रविड सध्या न्यूझीलँडमध्ये भारतीय अंडर १९ संघाचा प्रशिक्षक म्हणून गेला आहे.

उद्या आपला ४५वा वाढदिवस साजरा करत असलेल्या राहुल द्रविडला समितकडून हे खास बर्थडे गिफ्ट समजलं जात आहे.