रायगड, पुणे ६६ व्या राज्यजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत अजिंक्य

रायगडाने पुरुषांत बलाढ्य सांगलीला ४०-३५असे पराभूत करीत तब्बल १७ वर्षांनंतर “श्रीकृष्ण करंडकावर” आपले नाव कोरले. महिलांत पुण्याने मुंबई उपनगरला ३३-२३ असे नमवित “पार्वतीबाई सांडव चषक” आपल्या नावे केला.

महाराष्ट्र राज्य कबड्डी असो. च्या मान्यतेने नाशिक जिल्हा कबड्डी असो.ने जिल्हा परिषद नाशिक व सह्याद्री युवा मंच सिन्नर यांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या या स्पर्धेतील पुरुषांचा अंतिम सामना शेवटच्या क्षणापर्यंत चुरशीनें खेळा गेला. सांगलीच्या नितीन मदनेने आपल्या पहिल्याच चढाईत गडी टिपत संघाचे खाते उघडले. त्यानंतर भराभर गुण घेत रायगडवर लोण देत आणला. पण रायगडचा एक खेळाडू शिल्लक असताना त्याला पकडण्याची घाई सांगलीला नडली. त्याने बोनससह २ गडी टिपत रायगडच्या आशा पल्लवित केल्या. शेवटी १८व्या मिनिटाला लोण देत सांगलीने १९-१६अशी आघाडी घेतली.मध्यांतराला २२-२०अशी सांगलीकडे आघाडी होती. पण ही आघाडी फार काळ टिकली नाही.

मध्यांतरानंतरच्या खेळातील चौथ्या मिनिटाला रायगडाने लोणाची परतफेड करीत २६-२२अशी आघाडी आपल्याकडे घेतली. येथून रायगडाने मागेवळून पाहिले नाही.शेवटची ५मिनिटे पुकारली तेव्हा ३५-२८अशी रायगडाकडे आघाडी होती. या पाच मिनिटाच्या खेळात नितीन मदनेनी पंचांशी हुज्जत घातली म्हणून पंच सचिन नाक्ती यांनी त्याला “पिवळे कार्ड” दाखवून २ मिनिटे बाहेर बसविले.याचा फटका सांगलीला बसला. रायगडच्या या विजयात ५ अव्वल पकडी( सुपर कॅच) देखील तेवढ्याच महत्वाच्या ठरल्या. यातील दोन पकडी मदनेच्या आहेत.शेवटची काही मिनिटे असताना मदनेला झालेली अव्वल पकड व त्याला दाखविलेले पिवळे कार्ड सांगलीला पराभवाच्या गर्तेत घेऊन गेली.

रायगडकडून सुलतान डांगेने १८चढायात ३ बोनस व ३ गुण कमविले. एक वेळा त्याची पकड झाली. मोमीन शेखने १३ चढायात ५ गुण मिळविले, पण ३ वेळा त्याची पकड झाली. संकेत बनकरने ३ पकडी केल्या त्यातील २ अव्वल पकडी होत्या. मितेश पाटीलने देखील ३पकडी केल्या. सांगलीच्या राहुल वडारने १५ चढायात ६ गुण घेतले. नितीन मदनेने १५ चढायात २बोनस व ५गुण मिळविले, पण ४वेळा त्याची पकड झाली. त्याने थोडा संयमाने खेळ केला असता, तर विजय सांगलीला दुरावला नसता.

रायगडाने बाणेर-पुणे येथे २००१साली झालेल्या स्पर्धेत पुण्याला नमवित जेतेपद मिळविले होते. त्यानंतर १७ वर्षाने त्यांनी ही संधी साधली. वडाळा-मुंबई येथे २००२साली झालेल्या स्पर्धेत त्यांना उपनगरकडून पराभव पत्करावा लागला होता.या स्पर्धेच्या इतिहासातील त्यांचे हे चौथे जेतेपद. दोन वेळा ते उपविजेते ठरले. सिन्नर येथील या स्पर्धेत बाद फेरीतील उपउपांत्यपूर्व, उपांत्यपूर्व, उपांत्य व अंतिम अशा चारही सामन्यात रायगड मध्यांतरापर्यंत पिछाडीवर राहिले होते. या प्रत्येक सामन्यातील उत्तरार्धातील खेळात मात्र जोरकस खेळ करीत रायगडाने विजयश्री खेचून आणली आहे.

महिलांत पुण्याने गतवर्षी आपली १० वर्षांची परंपरा खंडीत करणाऱ्या उपनगरला पराभूत करीत गतवर्षीच्या पराभवाचा वचपा काढला. मध्यांतरापर्यंत चुरशीनें खेळल्या गेलेल्या या सामन्यात १०-०८अशी नाममात्र आघाडी पुण्याने राखली होती. उत्तरार्धात सामना तसा एकतर्फीच झाला. पुण्याकडून स्नेहल शिंदेने १२ चढायात ५ गुण मिळविले व २पकडी यशस्वी केल्या. २ वेळा तिची पकड झाली. सायली केरीपाळेने अष्टपैलू खेळाची चुणूक दाखविताना आपल्या ७ चढायात २ बोनस व १ गुण तर मिळविला.शिवाय ३पकडी यशस्वी देखील केल्या. अंकिता जगतापने ४यशस्वी पकडी करीत या विजयात महत्वाचा वाटा उचलला. त्यातील एक अव्वल पकड होती.

उपनगरच्या कोमल देवकरने १८चढायात ९गुण मिळविले खरे, पण तिची ६वेळा पकड झाली. त्यातील एक अव्वल पकड होती. कोमल उपनगरची हुकमी चढाईची खेळाडू असल्यामुळे तिला नामोहरम करण्याची व्यहरचना पुण्याने आखली होती. असे पुण्याच्या प्रशिक्षिका मोहिनी चाफेकर-जोग यांना या विजयाबाबत विचारले असता त्यांनी सांगितले. सायली नागवेकरने ९ चढायात अवघे २गुण मिळविले.दोन वेळा तिची पकड झाली. राणी उपहारने देखील ३ पकडी यशस्वी केल्या.पण त्यांचा हा खेळ उपनगरला विजय मिळवून देण्यास पुरेसा नव्हता.

महत्त्वाच्या बातम्या:

तिशी पुर्ण करताना विराट-सचिनने केलेल्या पराक्रमांचा तुलनात्मक आढावा

मॅच फिक्सिंगमध्ये आडकलेल्या खेळाडूला बेल वाजवण्याचा मान दिल्याने गौतम गंभीर नाराज

Video: एमएस धोनीने विराटला दिलेल्या बर्थडेच्या शुभेच्छा नक्की पहा