पहिल्या तीन वनडेतील साम्य बेंगळुरूलाही पाहायला मिळणार?

बेंगळुरू । भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया चौथा वनडे सामना २८ सप्टेंबर रोजी एम चिन्नस्वामी स्टेडियम, बेंगळुरू येथे होणार आहे. भारतीय संघाने या मालिकेत ३-० अशी विजयी आघडी घेतली आहे.

आज भारतीय संघ दुपारी २ वाजता इंदोरहुन बेंगळुरू शहराकडे रवाना झाला. याचा खास फोटो वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने कर्णधार विराट कोहलीबरोबर ट्विटरवर शेअर केला आहे.

या मालिकेत पहिल्या तीन सामन्यात एक खास गोष्ट पाहायला मिळाली ती म्हणजे प्रत्येक सामन्यापूर्वी पावसाने लावलेली हजेरी. चेन्नई वनडे तर पावसामुळे कमी षटकांची करावी लागली. कोलकाता वनडेवरही पावसाचे मोठे सावट होते परंतु सामना झाला. तर इंदोर शहरात तिसरा वनडे सुरु होण्यापूर्वी २ आठवडे सलग पाऊस पडत होता.

आता भारताचा सामना ज्या शहरात होणार आहे त्या ऐतिहासिक बेंगळुरू शहरातही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. गेल्या २४ तासात जवळजवळ ५४ मिमी पाऊस बेंगळुरू शहरात झाला आहे. परंतु या शहरातील क्रिकेटप्रेमींसाठी आशादायक गोष्ट म्हणजे या मैदानाची असलेली डेनेज सिस्टीम. अगदी मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला तरी अगदी थोड्या वेळात हे मैदान पुन्हा सामना सुरु करण्यासाठी तयार असते.

यदाकदाचित आपणास माहित नसेल तर-

चिन्नास्वामी मैदानावर भारताने आजपर्यंत १९ वनडे सामने खेळले असून त्यात १३ सामन्यात विजय मिळवला आहे. एक सामना टाय झाला असून एका सामन्यात कोणताही निकाल लागला नाही. ऑस्ट्रेलिया संघासाठी मात्र हे ग्राउंड विशेष काही चांगले ठरले नाही. ऑस्ट्रेलियाने या मैदानावर ८ सामन्यात केवळ तीन विजय मिळवले असून ४ सामन्यात त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे तर एका सामन्यात कोणताही निकाल लागला नाही.

 

हे मैदान बेंगळुरू शहरातील एमजी रोड जवळ असून मुख्य शहरात आहे. येथे क्रिकेटचा मोठा चाहतावर्ग असून चेन्नई शहरांप्रमाणेच येथील क्रिकेटप्रेमी हे अभ्यासू क्रिकेटप्रेमी समजेल जातात. कर्णधार विराट कोहलीसाठी हे मैदान दुसरे घरचेच मैदान असल्यासारखे आहे. विराट बेंगळुरू संघाचा आयपीएलमध्ये कर्णधार असल्यामुळे या शहराशी त्याचे खास नाते आहे.