आजच्या सामन्यात पावसाची शक्यता

हैद्राबाद। आज भारतीय संघाचा ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध तिसरा आणि टी २० मालिकेतील शेवटचा सामना होणार आहे. परंतु या निर्णायक सामन्यात पाऊस महत्वाची भूमिका बजावेल अशी शक्यता आहे.

गेल्या आठवडाभर हैद्राबादमध्ये पाऊस पडत आहे. त्यामुळे या सामन्यातही पाऊस पडेल याची शक्यता आहे.

त्याचबरोबर राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर (हैद्राबाद) अशी व्यवस्था करण्यात आली आहे की जेणेकरून कोणत्याही समस्येशिवाय तिथे सामना होऊ शकेल. सामना क्युरेटर म्हणाले की नुकत्याच झालेल्या पाऊसामुळे खेळपट्टीवर परिणाम झालेला नाही. परंतु, खेळपट्टीच्या आजूबाजूला थोडाफार परिणाम झाला आहे. तरीही ज्या भागात हा परिणाम झाला आहे ती जागा सुकवण्यासाठी फॅन लावण्यात आले आहेत.

आज होणारा सामना हा निर्णायक सामना आहे. या मालिकेत झालेल्या दोन सामन्यांपैकी भारतीय संघाने एक तर ऑस्ट्रेलिया संघाने एक सामना जिंकत मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. म्हणूनच आजचा सामना मालिकेचा विजेता ठरवणार आहे.