रैनाचा आज पुन्हा धमाका, मोडला कोहलीचा मोठा विक्रम

कोलकाता। सईद मुश्ताक अली टी २० ट्रॉफी स्पर्धेत आज उत्तर प्रदेश विरुद्ध तामिळनाडू संघात सामना सुरु आहे. या सामन्यात सुरेश रैनाने अर्धशतक झळकावत कर्णधार विराट कोहलीचा एक मोठा विक्रमाला मागे टाकले आहे.

या सामन्यात रैनाने उत्तर प्रदेशकडून खेळताना ४१ चेंडूत ६१ धावा करताना ट्वेंटी२० क्रिकेट प्रकारात एक भारतीय खेळाडू म्हणून सर्वात जास्त धावा करण्याचा विक्रम केला आहे. त्याचे आता ट्वेंटी२० क्रिकेटमध्ये ७११४ धावा झाल्या आहेत. याआधी हा विक्रम विराट कोहलीने केला होता. विराट कोहलीचे सध्या ट्वेंटी२० क्रिकेटमध्ये ७०६८ धावा आहेत.

ट्वेंटी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा विंडीजच्या ख्रिस गेलने केले आहेत. गेलच्या ट्वेंटी२० क्रिकेट प्रकारात ११०६८ धावा आहेत. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर ८७६९ धावांसह ब्रेंडन मॅक्युलम आहे. या यादीत विराट नवव्या क्रमांकावर तर रैना आठव्या क्रमांकावर आहे.

रैनाने याच स्पर्धेत काल बंगाल संघाविरुद्ध ५९ चेंडूत नाबाद १२६ धावांची खेळी केली होती. याबरोबरच त्याने टी २० क्रिकेट प्रकारात ७००० धावांचाही टप्पाही पार केला होता. असे करणारा तो केवळ विराट नंतरचा दुसराच भारतीय ठरला होता.

आज सुरु असलेल्या सामन्यात उत्तर प्रदेश संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ४ बाद १६२ धावा करून तामिळनाडूला १६३ धावांचे आव्हान दिले आहे. या आव्हानाचे प्रतिउत्तर देताना तामिळनाडूने १६ षटकात ४ बाद १३ धावा केल्या आहेत.