सलग तिसऱ्या दिवशीही रैनाचा धडाका कायम, टी२० क्रिकेटमधील मोठी कामगिरी

कोलकाता। सईद मुश्ताक अली टी २० ट्रॉफीमध्ये बडोदा विरुद्ध उत्तर प्रदेश संघात आज पार पडलेल्या सामन्यात सुरेश रैनाने पुन्हा एकदा अर्धशतक झळकावले आहे. त्याच्याबरोबरच उमंग शर्मानेही अर्धशतक केले आहे. त्यांच्या अर्धशतकाच्या जोरावर उत्तर प्रदेशने या सामन्यात ७ विकेट्सने विजय मिळवला.

रैनाने सलग तिसऱ्या दिवशी अशी चांगली कामगिरी केली आहे. कालच रैना ट्वेंटी२० क्रिकेट प्रकारात एक भारतीय खेळाडू म्हणून सर्वात जास्त धावा करण्याचा विक्रम केला आहे. त्याने हा विक्रम करताना विराट कोहलीला मागे टाकले होते. तसेच ट्वेंटी२० मध्ये ७००० धावा करणारा तो दुसराच भारतीय खेळाडू ठरला होता.

रैनाने काल तामिळनाडू विरुद्ध ६१ धावा केल्या होत्या. तर परवा बंगाल विरुद्ध त्याने ५९ चेंडूत १२६ धावांची शतकी खेळी केली होती.

आजच्या सामन्यात बडोदा संघाने उत्तर प्रदेश समोर २० षटकात १९३ धवनची आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना उमंग शर्मा आणि सुरेश रैना यांनी दमदार अर्धशतके केली. शर्माचे शतक ५ धावांनी थोडक्यात हुकले. त्याने ४७ चेंडूत ९५ धावा केल्या तर सुरेश रैनाने ४७ चेंडूत ५४ धावा केल्या. या दोघांनी मिळून १६० धावांची भागीदारी रचली.

तत्पूर्वी बडोदाने प्रथम फलंदाजी करताना ३ बाद १९२ धावा केल्या. त्यांच्याकडून उर्वील पटेलने ९६ धावांची खेळी केली. त्याचेही शतक थोडक्यात हुकले.