राष्ट्रीय सब-ज्युनिअर रोलबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत महाराष्ट्राच्या मुलींचा पराभव

राजस्थान संघाने पटकाविला दुहेरी मुकुट

पुणे: भारतीय रोलबॉल महासंघ आणि महाराष्ट्र रोलबॉल संघटना यांच्या वतीने आयोजित १२ व्या राष्ट्रीय सब-ज्युनियर स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलींच्या संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. राजस्थान संघाने महाराष्ट्र संघाची घोडदौड रोखून मुलींच्या गटाचे विजेतेपद पटकावले. यानंतर राजस्थानने मुलांच्या गटाचेही विजेतेपद मिळवून दुहेरी मुकुटाची कमाई केली.

स्पर्धेच्या  पारितोषिक वितरणप्रसंगी मध्यप्रदेश विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. देवेंद्रसिंग धूत, प्रताप राव, रविंद्र सिंग, ओमन रोल बॉल फेडरेशनचे अध्यक्ष कासीम, सचिव बदर, विनोद कुमार उपस्थित होते.

म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडांनगरीत ही स्पर्धा झाली. या स्पर्धेतील मुलींच्या गटातील अंतिम फेरीत राजस्थान संघाने महाराष्ट्र संघाचा ६-२ ने पराभव केला. मध्यंतराला राजस्थान संघाने ५-० अशी आघाडी घेऊन विजयाचा पाया रचला. उत्तरार्धात महाराष्ट्राच्या मुलींनी राजस्थानच्या मुलींना रोखण्यात यश मिळवले, मात्र त्यांना पिछाडी भरून काढण्यात यश आले नाही.

राजस्थानकडून प्रितिका तरावत हिने (१, २,५, ७ मि.) हॅट्ट्रिकसह चार गोल केले, तर जान्हवी( ४ मि.) आणि लविशा शर्मा (१७ मि.) यांनी प्रत्येकी एक गोल करून तिला चांगली साथ दिली. महाराष्ट्र संघाकडून मेहेक राऊत (१९, २० मि.) हिने दोन गोल केले.

मुलांच्या गटाच्या अंतिम लढतीत राजस्थान संघाने उत्तर प्रदेश संघावर ५-२ने मात केली. राजस्थान संघाकडून अमनने हॅट्ट्रिक नोंदवली. त्याने ८,९ आणि १७व्या मिनिटाला गोल केले. भावोनी (६,१८ मि.) याने दोन गोल करून त्याला चांगली साथ दिली. उत्तर प्रदेश संघाकडून सचिन (१५ मि.)आणि हिमांशू(१८मि.) यांनी प्रत्येकी एक गोल केला.