अजिंक्य राहणे राजस्थान रॉयल्सचा नवीन कर्णधार

पुढील महिन्यात ७ एप्रिलपासून सुरु होणाऱ्या आयपीएलच्या ११ व्या मोसमासाठी राजस्थान रॉयल्स संघाने आपल्या संघाचा कर्णधार बदलला आहे. त्यामुळे आता राजस्थान संघाचा नवीन कर्णधार अजिंक्य रहाणे असणार आहे.

राजस्थानने काही दिवसांपूर्वीच स्टीव्ह स्मिथला कर्णधार म्हणून घोषित केले होते. पण काल स्मिथला चेंडू छेडछाड प्रकरणात दोषी ठरवल्यानंतर त्याला राजस्थान संघाने कर्णधार पदावरून काढून टाकले. तसेच त्याला ऑस्ट्रेलिया संघाच्या कर्णधारपदावरूनही काल पायउतार व्हावे लागले आहे.

राजस्थान रॉयल्सने आज त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून अजिंक्य राहणेकडे संघाचे नेतृत्व सोपवल्याची माहिती दिली आहे. त्यांनी त्यात लिहिले आहे की, राजस्थान रॉयल्सने अजिंक्य रहाणेला आयपीएल २०१८ साठी कर्णधार म्हणून नेमले आहे.”

तसेच राजस्थान संघाचे सहसंघमालक मनोज बादल म्हणाले की खेळ हा कोणत्याही व्यक्तीपेक्षा मोठा आहे आणि आम्ही या विचारानेच हा निर्णय घेतला आहे.

अजिंक्य रहाणेने आत्तापर्यंत भारताचे २ वेळा आंतराष्ट्रीय टी २० मध्ये नेतृत्व केले आहे. यात त्याच्या नेतृत्वाखाली भारताने १ विजय तर १ पराभव मिळवला आहे.