हा खेळाडू ठरला आयपीएलच्या ११ व्या मोसमातील आत्तापर्यंतचा सर्वात महागडा भारतीय खेळाडू

आज आयपीएल २०१८ च्या लिलावाचा दुसरा दिवस आहे. आज सकाळच्या सत्रात वेगवान गोलंदाजांसाठी फ्रॅन्चायझींमध्ये चांगलीच स्पर्धा पाहायला मिळाली. यात सर्वात जास्त भाव खाऊन गेला तो जयदेव उनाडकट.

जयदेवची बेस प्राईस १.५० कोटी इतकी होती. परंतु त्याला संघात घेण्यासाठी चेन्नई सुपर किंग्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब या दोन फ्रॅन्चायझींमध्ये चुरस लागली. या दोन्ही फ्रॅन्चायझींनी त्याची बोली ११ कोटींपर्यंत नेली आणि अखेरच्या क्षणी या बोलीत राजस्थान रॉयल्सने उतरून जयदेवसाठी ११.५० कोटीची बोली लावून त्याला संघात घेतले.

त्यामुळे जयदेव यावर्षीच्या आयपीएलमध्ये बेन स्टोक्स नंतरचा सर्वात महागडा खेळाडू ठरला. त्याने मागील वर्षी आयपीएलमध्ये पुणे संघाकडून खेळताना उत्तम कामगिरी केली होती. तसेच त्याला श्रीलंका विरुद्ध झालेल्या टी २० मालिकेसाठी मालिकावीर म्हणून पुरस्कारही मिळाला होता.