अजिंक्य रहाणे म्हणतो, ती गोष्ट केली तर विश्वचषकासाठी संघातील स्थान पक्के…

ऑस्ट्रेलिया विरुद्ध नुकत्याच पार पडलेल्या मर्यादीत षटकांच्या क्रिकेट मालिकांमध्ये भारतीय संघातील मधल्या फळीच्या उणीवा स्पष्टपणे दिसून आल्या. तसेच चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठीही अनेक पर्यांयांचा विचार करण्यात आला. पण कोणालाही या क्रमांकावर विशेष अशी छाप सोडता आली नाही.

त्यातच विश्वचषक स्पर्धा दोन महिन्यांवर आली असल्याने भारतीय संघ व्यवस्थापनासमोर मधल्या फळीचा प्रश्न उभा आहे. त्यामुळे राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणे मधल्या फळीत जागा मिळवण्यासाठी स्वत:ला सिद्ध करण्यास उत्सुक आहे.

याबद्दल रहाणेने म्हटले आहे की अगामी आयपीएलमध्ये जर चांगली कामगिरी केली तर अपोआप विश्वचषकासाठीही संघात स्थान मिळेल.

आयएएनएसशी बोलताना रहाणे म्हणाला, ‘विश्वचषकाच्या भारतीय संघातील स्थानासाठी कोणताही वेगळा दृष्टीकोन असणार नाही कारण शेवटी तूम्ही क्रिकेट खेळत असता, मग ते आयपीएल असो किंवा दुसरी कोणती स्पर्धा. तूम्ही धावा करणे आणि संघासाठी चांगली कामगिरी करणे अपेक्षित असते.’

‘खूप पुढील विचार करण्यापेक्षा अत्ता राजस्थान रॉयल्सचा विचार करणे महत्त्वाचे आहे. हे बघा जर मी आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली तर मला विश्वचषकासाठी संघात स्थान अपोआप मिळेल.’

तसेच रहाणे पुढे म्हणाला, ‘मला वाटते की तूम्ही स्वत:ला व्यक्त करणे महत्त्वाचे आहे आणि ज्या गोष्टी आपल्या नियंत्रणात नाही त्यांचा विचार करुन दबाव घेऊ नये. सध्या लक्ष्य हे आयपीएलवरच केंद्रीत असणार आहे.’

रहाणेने शेवटचा वनडे सामना 16 फेब्रुवारी 2018 ला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला आहे. त्यानंतर तो जवळ जवळ एक वर्षापासून भारताच्या मर्यादीत षटकांच्या क्रिकेट संघातून बाहेर आहे.

त्याने आत्तापर्यंत 90 वनडे सामने खेळले असून 35.26 च्या सरासरीने 2962 धावा केल्या आहेत. यात तीन शतकांचा आणि 24 अर्धशतकांचा समावेश आहे.

रहाणे मागील वर्षीप्रमाणे यावर्षीही राजस्थान रॉयल्स संघाचे नेतृत्व करणार आहे. यावर्षीच्या आयपीएलमध्ये राजस्थानचा पहिला सामना 25 मार्चला किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

आज गौतम गंभीरसह या चार खेळाडूंचा झाला पद्म पुरस्काराने सन्मान

कोलकाता नाईट रायडर्सचे दोन महत्त्वाचे खेळाडू संघातून बाहेर

विश्वचषक २०१९मध्ये तो खेळाडू १००% खेळणार, कोहलीने अप्रत्यक्षपणे केले स्पष्ट