रणजी ट्रॉफी: मुंबई विरुद्ध बडोद्याची मोठी आघाडी !

मुंबई। वानखेडे स्टेडियममध्ये सुरु असलेल्या मुंबई विरुद्ध बडोदा रणजी सामन्यात बडोद्याच्या संघाने सामन्याच्या दुसऱ्या दिवसाखेर २०५ धावांची आघाडी घेतली आहे. बडोद्याच्या ४ बाद ३७६ धावा केल्या आहेत.

बडोद्याने पहिल्या डावात कालच्या १ बाद ६३ धावांपासून पुढे खेळताना चांगला खेळ केला आहे. त्यामुळे मुंबईचा संघ मागे पडला. बडोद्याकडून खेळताना काल नाबाद असणाऱ्या आदित्य वाघमोडे (१३८) आणि विष्णू सोळंकी (५४) या जोडीने चांगला खेळ केला आदित्य वाघमोडेने शतक साजरे केले.

त्याने ३०९ चेंडूत १३८ धावा केल्या. यात त्याने १३ चौकार आणि १ षटकार मारले. अखेर कामचलाऊ गोलंदाज म्हणून श्रेयश अय्यरने गोलंदाजी केली आणि आदित्यला अजिंक्य रहाणे करवी त्याला झेलबाद केले.

यानंतर आलेल्या दीपक हुडानेही आक्रमक अर्धशतक केले. त्याने ७५ धावांची खेळी करताना ३ चौकार आणि ५ षटकार मारले. दीपक आणि पाचव्या क्रमांकावर खेळायला आलेल्या स्वप्नील सिंग यांनी शतकी भागीदारी रचत बडोद्याला भक्कम स्थितीत नेले. अखेर ही भागीदारी तोडण्यात मुंबई गोलंदाज विजय गोहीलला यश आले. त्याने दीपकला धवल कुलकर्णी करवी झेलबाद केले.

सामन्याच्या दुसऱ्या दिवसाखेर स्वप्नील सिंग ६३ धावांवर तर अभिजित करंबेळकर ८ धावांवर नाबाद आहेत. मुंबईकडून शार्दूल ठाकूर, श्रेयश अय्यर, रोवस्तान डायस आणि विजय गोहिल यांनी प्रत्येकी १ बळी घेतला.

तत्पूर्वी काल सामन्याच्या पहिल्या दिवशी मुंबईचा संघ पहिल्या डावात १७१ धावांवर सर्वबाद झाला होता.

संक्षिप्त धावफलक:
मुंबई पहिला डाव: सर्वबाद १७१ धावा
बडोदा पहिला डाव : ४ बाद ३७६ धावा
स्वप्नील सिंग (६३), अभिजित करंबेळकर (८) खेळत आहेत.