रणजी ट्राॅफी सामन्यात मुंबईकर खेळाडूंनी केली मास्क घालून फलंदाजी

नोव्हेंबर महिन्यात दिल्लीमध्ये मागील काही वर्षापासून प्रदुषणाचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे. याचा त्रास विविध खेळाडूंवरही होत आहे.

सध्या चालू असणाऱ्या रणजी ट्रॉफी स्पर्धेतील रेल्वे विरुद्ध मुंबई संघातील सामन्यात खेळाडूंनी प्रदुषणाचा त्रास होऊ नये म्हणून मास्क घालून खेळणे पसंत केले आहे.

रेल्वे विरुद्ध मुंबई यांच्यातील सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी फलंदाजी करताना मुंबईचा फलंदाज सिद्धेश लाड मास्क घालून खेळत होता.

तसेच मुंबईचे प्रशिक्षक विनायक सामंत यांनीही खराब वातावरणाबाबत तक्रार केली आहे. त्यांनी सांगितले की मुंबईचा वेगवान गोलंदाज तुषार देशपांडे दिल्लीत आल्यापासून आजारी पडला आहे.

तुषारबद्दल सामंत यांनी बुधवारी सांगितले होते की, “तुषारला बरे वाटत नाही. त्याला उलट्याही झाल्या आहेत. तसेच त्याचे डोकेही दुखत आहे आणि तो दिल्ली आल्यापासून त्याला तापही आहे. पण तो पहिला सामना खेळणार आहे.”

मागील वर्षीही प्रदुषणाच्या कारणाने बीसीसीआयने दिल्लीमधील दोन रणजी सामने रद्द केले होते. तसेच त्यानंतर काही दिवसांनी फिफानेही प्रदुषणाच्या कारणानेच 17 वर्षांखालील फुटबॉल विश्वचषकाचे साखळी फेरीच्या सामन्यांसाठी दिल्ली हे ठीकाण वगळले होते.

तसेच मागील वर्षी श्रींलकेचा क्रिकेट संघ भारत दौऱ्यावर आला असताना त्यांनाही दिल्लीतील खराब वातावरणाचा त्रास झाला होता. त्यावेळी त्यांनीही मास्क घालून खेळणे पसंत केले होते.

महत्त्वाच्या बातम्या:

Video: जेव्हा धोनीच्या मस्करीमुळे घाबरतो ‘हिटमॅन’ रोहित शर्मा

 

ISL 2018: चेन्नईला पहिल्या विजयाची आशा

जम्मू-काश्मिरच्या या गोलंदाजाची कमाल, घेतल्या ४ चेंडूत ४ विकेट्स