रणजी ट्रॉफी: मुंबईच्या उपांत्य फेरीतील आशा जवळपास संपुष्टात !

नागपूर। येथील विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडिअमवर सुरु असलेल्या कर्नाटक विरुद्ध मुंबई रणजी ट्रॉफीतील उपांत्यपूर्व सामन्यात दुसऱ्या दिवसाखेर कर्नाटकने पहिल्या डावात ६ बाद ३९५ धावा केल्या आहेत.

कर्नाटकच्या ४ फलंदाजांनी आज अर्धशतके झळकावली आहेत. आज त्यांनी कालच्या १ बाद ११५ धावांवरून पुढे खेळायला सुरुवात केली. काल नाबाद असलेली मयांक अग्रवाल(७८) आणि मीर कौनायान अब्बास(५०) यांनी सुरुवात चांगली केली.

अग्रवालने कालच त्याचे अर्धशतक साजरे केले होते तर आज त्याच्याबरोबर अब्बासनेही अर्धशतक केले. हे दोघे बाद झाल्यावर सीएम गौतम(७९) आणि श्रेयश गोपाळ (८०*) यांनी देखील आपले अर्धशतके साजरी केली. श्रेयश अजूनही नाबाद आहे. त्याच्या साथीला काल मुंबईचे सहा बळी मिळवणारा कर्नाटकचा कर्णधार विनय कुमार ३१ धावांवर नाबाद आहे.

याबरोबरच कर्नाटकडून रवीकुमार समर्थ (४०), करूण नायर (१६) आणि पवन देशपांडे(८) यांनीही धावा केल्या आहेत.

मुंबईकडून शिवम दुबे (५/७९) आणि शिवम मल्होत्रा (१/८१) बळी घेतले आहेत. कर्नाटक आता या सामन्यात २२२ धावांनी आघाडीवर आहे.

संक्षिप्त धावफलक:
मुंबई पहिला डाव: सर्वबाद १७३ धावा
कर्नाटक पहिला डाव: ६ बाद ३९५ धावा
श्रेयश गोपाळ (८०*) आणि विनय कुमार(३१*) खेळत आहे.