संघ अडकला ट्रॅफिकमध्ये, सामन्याला झाला अर्धा तास उशीर

कोलकाता । आज कोलकाता मॅरेथॉनमुळे विदर्भ रणजी संघाला पोहचायला उशीर झाला. त्यामुळे सामना नियोजित वेळेपेक्षा ३०मिनिटे उशिरा सुरु झाला.

इडन गार्डन मैदानावर आज विदर्भ विरुद्ध कर्नाटक सेमीफायनलचा पहिला दिवस होता. परंतु कोलकाता मॅरेथॉनच्या चौथ्या मोसमातील हजारो धावपटू इडन गार्डन जवळून धावत असल्यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती.

या मॅरेथॉनमध्ये मोठ्या प्रमाणावर देश विदेशातील धावपटूंनी भाग घेतला होता. त्यामुळे येथील बहुतेक रस्त्यांवर वाहनांसाठी बंदी होती. त्यात विदर्भाचे खेळाडू येथील ताज बंगाल हॉटेलमध्ये राहत होते. तेथेही मोठया प्रमाणावर रस्ते बंद होते.

“आम्ही ट्रॅफिक जाममध्ये अडकल्यामुळे आम्हाला पोहचायला उशीर झाला. ” संघ व्यवस्थापनाकडून कळवण्यात आले.

विदर्भ रणजी संघाने हॉटेल ८ वाजून ४५ मिनिटांनी सोडले होते आणि संघ मैदानावर पोहचला ९ वाजून १५ मिनिटे.

हा सामना नियोजित वेळेप्रमाणे ९वाजता सुरु होणे अपेक्षित होते परंतु सामना प्रत्यक्षात सुरु झाला तो ९ वाजून ३० मिनिटांनी.

कर्नाटकचा संघ मैदानाजवळील हॉटेल ललित ग्रेट इस्टर्नला थांबल्यामुळे त्यांना कोणत्याही संकटाचा सामना करावा लागला नाही.