समीर दिघे मुंबई रणजी संघाचे नवे प्रशिक्षक

मुंबई: माजी कसोटीपटू आणि यष्टीरक्षक समीर दिघे यांची मुंबई रणजी संघाच्या प्रशिक्षकपदी पुढच्या मोसमासाठी नियुक्ती झाली.

मुंबई क्रिकेट असोशिएशनने दिलेल्या प्रसिद्ध पत्रकात ही नियुक्ती २०१७-१८ ह्या मोसमासाठी असल्याचं म्हटलं आहे.

भारतीय क्रिकेट संघाकडून आंतरराष्ट्रीय सामने खेळलेले समीर दिघे आणि प्रवीण आम्रे हे प्रशिक्षक पदाच्या प्रबळ दावेदारांमध्ये होते. गेल्या मोसमात मुंबईच्या प्रशिक्षक पदाची धुरा वाहणाऱ्या चंद्रकांत पंडित यांच्याकडून दिघे सूत्र सांभाळतील.

दिघे यांना खूप मोठा असा प्रशिक्षणाचा अनुभव नसला तरी त्यांनी भारताकडून ६ कसोटी आणि २३ एकदिवसीय सामन्यात अनुक्रमे १४१ व २५६ धावा केल्या आहेत. त्यांनी भारताकडून २००० ते २००१ या सालात क्रिकेट खेळले आहे. असे असले तरी दिघे यांनी फर्स्ट क्लासचे ८३ तर लिस्ट अचे १०७ सामने मुंबईकडून खेळले आहेत.

दिघे यांनी पीटीआय संस्थेशी बोलताना म्हटले आहे की हा खरंच सन्मान आहे परंतु एक आव्हान देखील माझ्यासाठी आहे.
“ही एक नवी संधी आहे. मुंबई ४० वेळा रणजी विजेते आहेत आणि संघाला माझ्याकडून अपेक्षा आहेत. ” असेही ४८ वर्षीय दिघे पुढे म्हणाले.

गेल्याच आठवड्यात अजित आगरकरची मुंबईच्या निवड समिती प्रमुखपदी निवड झाली होती.