रणजी ट्रॉफी: मुंबई पराभवाच्या छायेत ??

नागपूर। येथे सुरु असलेल्या कर्नाटक विरुद्ध मुंबई उपांत्यपूर्व रणजी सामन्यात मुंबईने तिसऱ्या दिवसाखेर दुसऱ्या डावात ३ बाद १२० धावा केल्या आहेत. परंतु मुंबई अजूनही २७७ धावांनी पिछाडीवर आहे. तत्पूर्वी कर्नाटकने पहिल्या डावात शतकाच्या जोरावर ५७० धावांचा डोंगर उभा केला आहे.

आजही मुंबईच्या सलामीवीरांनी विशेष काही केले नाही. पृथ्वी शॉ १४ धावांवर असताना श्रीनाथ अरविंदच्या गोलंदाजीवर, तर जय गोकुळ बिस्त २० धावांवर असताना कृष्णप्पा गॉथमच्या गोलंदाजीवर त्रिफळाचित झाले.

त्यामुळे मुंबईची अवस्था २ बाद ३४ अशी झाली होती. त्यानंतर मात्र अखिल हेरवाडकर आणि सूर्यकुमार यादवने मुंबईचा डाव सावरला. परंतु अखिल २७ धावांवर असताना गोथॅमच्याच गोलंदाजीवर झेलबाद झाला.

यादवने मात्र आपले नाबाद अर्धशतक पूर्ण करताना दिवसाखेर ११५ चेंडूत ५५ धावा केल्या आहेत. त्याच्या साथीला आकाश पारकर ३ धावांवर खेळत आहे.

तत्पूर्वी, कर्नाटकने कालच्या ६ बाद ३९५ धावांवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली. काल ८० धावांवर नाबाद असणाऱ्या श्रेयश गोपाळने आज त्याचे दीडशतक पूर्ण केले. त्याने २७४ चेंडूत नाबाद १५० धावा केल्या. या खेळीत त्याने ११ चौकार मारले.

त्याचबरोबर कर्नाटकच्या ११ व्या क्रमांकावर खेळायला आलेल्या अरविंदने देखील त्याचे अर्धशतक पूर्ण केले. तसेच आज कर्नाटक संघाचा कर्णधार विनय कुमार(३७) आणि कृष्णप्पा गॉथमने(३८) यांनी धावा केल्या.

मुंबईकडून या डावात शिवम दुबे (५/९८),शिवम मल्होत्रा (३/९७) आणि धवल कुलकर्णी(२/१०५) यांनी बळी घेतले आहेत.

संक्षिप्त धावफलक:

मुंबई पहिला डाव: सर्वबाद १७३ धावा
कर्नाटक पहिला डाव: सर्वबाद ५७० धावा
मुंबई दुसरा डाव: ३ बाद १२० धावा
सूर्यकुमार यादव(५५*) आणि आकाश पारकर (३*) खेळत आहेत.