रणजी ट्रॉफी: ऐतिहासिक ५००व्या रणजी सामन्यात मुंबई पराभवाच्या छायेत !

मुंबई। येथील वानखेडे स्टेडियमवर सुरु असलेल्या मुंबई विरुद्ध बडोदा संघातील रणजी सामन्यात मुंबईने तिसऱ्या दिवसाखेर दुसऱ्या डावात ४ बाद १०२ धावा केल्या आहेत.

मुंबई अजूनही ३०२ धावांनी मागे आहे. मुंबईच्या दुसऱ्या डावात सुरवातीलाच कर्णधार आदित्य तारेच्या रूपाने पहिला बळी गमावला. त्यानंतर मात्र युवा सलामीवीर पृथ्वी शॉ आणि अजिंक्य रहाणे यांनी अर्धशतकी भागीदारी केली. ही ६२ धावांची भागीदारी स्वप्नील सिंगने पृथ्वीला त्रिफळाचित करून तोडली.

पृथ्वीच्या पाठोपाठ लगेचच श्रेयश अय्यर आणि विजय गोहिल बाद झाले. त्यामुळे मुंबई ची अवस्था ४ बाद ९९ अशी झाली. सध्या तिसऱ्या दिवसाखेर अजिंक्य रहाणे(२८) आणि सूर्यकुमार यादव (२) नाबाद खेळत आहेत.

बडोद्याकडून अतीत शेठ, स्वप्नील सिंग, रोवस्तान डायस आणि लुकमान मेरीवाला यांनी प्रत्येकी १ बळी घेतला.

तत्पूर्वी बडोद्याच्या पहिल्या डावात कालच्या ४ बाद ३७६ धावापासून पुढे खेळताना चांगला खेळ केला. काल नाबाद असलेली जोडी स्वनिल स्वप्नील सिंग आणि अभिजित करंबेळकर यांनी सुरवात केली परंतु दिवसाच्या सुरवातीलाच अभिजित बाद झाला. तर स्वप्नीलने त्याचे शतक साजरे केले. त्याने त्याच्या १६४ धावांच्या खेळीत १० चौकार आणि ४ षटकार मारले.

त्यानंतर आलेले मितेश पटेल, अतीत शेठ आणि कार्तिक काकडे या तळातील फलंदाजांना स्वप्नीलला विशेष साथ देता आली नाही परंतु स्वप्नीलने आपला खेळ सुरु ठेवला होता अखेर धवल कुलकर्णीने त्याला श्रेयश अय्यर करवी झेलबाद केले. यानंतर बडोद्याने ९ बाद ५७५ धावांवर डाव घोषित केला.
मुंबईकडून शार्दूल ठाकूरने ३ बळी घेतले तर धवल कुलकर्णी आणि विजय गोहिल यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.

मुंबईने पहिल्या डावात सर्वबाद १७१ धावा केल्या होत्या.

संक्षिप्त धावफलक:
मुंबई पहिला डाव: सर्वबाद १७१ धावा
बडोदा पहिला डाव :९ बाद ५७५ धावा (घोषित)
मुंबई दुसरा डाव: ४ बाद १०२ धावा
अजिंक्य रहाणे(२८) आणि सूर्यकुमार यादव (२) खेळत आहेत.