ओडिसा विरुद्ध मुंबई: मुंबईची सामन्यावर मजबूत पकड !

भुवनेश्वर। ओडिसा विरुद्ध मुंबई संघात सुरु असलेल्या सामन्यात आज दुसऱ्या दिवसाअखेर मुंबई संघाने ओडिसा संघाला पहिल्या डावात १४५ धावांवर रोखल्यानंतर मुंबईने दुसऱ्या डावात ३ बाद ५८ धावा करत १४४ धावांची बढत घेतली आहे.

मुंबईने पहिल्या डावाप्रमाणेच दुसऱ्या डावाची खराब सुरुवात केली. अखिल हेरवाडकर ३ धावांवर बाद झाला त्याच्या पाठोपाठ अजिंक्य रहाणे शून्यावर बाद झाला. त्यातच पहिल्या डावातील शतकवीर पृथ्वी शॉचे ४ धावांनी अर्धशतक हुकले. तो ४६ धावांवर बाद झाला. सध्या मुंबई १६ षटकात ५८ धावांवर खेळत आहे. सूर्या कुमार यादव आणि नाईट वॉचमन म्हणून आलेला धवल कुलकर्णी खेळत आहेत.

तत्पूर्वी मुंबई संघाने पहिल्या डावात सर्वबाद २८९ धावा केल्या. यात सलामीवीर पृथ्वी शॉने १०५ धावांची शतकी खेळी केली होती. याचे प्रतिउत्तर देताना ओडिशाच्या फलंदाजांची चांगलीच दमछाक झाली.

ओडिसाने पहिल्या डावात सर्वबाद १४५ धावा केल्या. यात बिप्लाब सामतरायने नाबाद ७२ धावांची खेळी केली बाकीच्या फलंदाजांनी मात्र विशेष काही केले नाही. मुंबईकडून अभिषेक नायर आणि विजय गोहिल यांनी प्रत्येकी ३ बळी घेतले.

संक्षिप्त धावफलक:
मुंबई पहिला डाव: सर्वबाद- २८९ धावा
ओडिसा पहिला डाव: सर्वबाद- १४५ धावा
मुंबई दुसरा डाव: ३ बाद ५८ धावा
पृथ्वी शॉ- ४६ धावा , सूर्य कुमार यादव (०९) आणि धवल कुलकर्णी(०) खेळत आहेत.