रणजी ट्रॉफी: उद्यापासून रंगणार दिल्ली विरुद्ध विदर्भ अंतिम सामना

इंदोर। उद्यापासून रणजी ट्रॉफी स्पर्धेतील अंतिम फेरी होळकर क्रिकेट स्टेडिअम, इंदोर येथे रंगणार आहे. या फेरीत दिल्ली आणि विदर्भ संघ आमने सामने येणार आहेत. गेले तीन महिने चालू असलेल्या या स्पर्धेने अखेरचा टप्पा गाठला आहे.

दिल्ली आणि विदर्भ संघ उपांत्य फेरीत चांगली कामगिरी करून अंतिम फेरीत पोहोचले असल्याने दोन्ही संघाचा आत्मविश्वास चांगलाच वाढला असणार. तसेच या दोन्ही संघांनी साखळी सामन्यात एकदाही पराभव स्वीकारलेला नाही.

दिल्ली संघाने उपांत्य सामन्यात बंगाल संघावर सहज मात केली होती. या सामन्यात दिल्लीने १ डाव आणि २६ धावांनी विजय मिळवला होता. दिल्लीच्या या विजयात शतकवीर गौतम गंभीर, कुणाल चंदेला आणि या सामन्यात ७ बळी घेतलेल्या नवदीप सैनी यांनी मोलाची कामगिरी बजावली होती.

याबरोबरच विदर्भानेही आठवेळाच्या विजेत्या कर्नाटकविरुद्ध अटीतटीच्या झालेल्या सामन्यात ५ धावांनी विजय मिळून पहिल्यांदाच रणजी ट्रॉफीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. या सामन्यात विदर्भाच्या रजनीश गुरबानीने १२ बळी घेऊन संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता.

विदर्भ संघ उद्यापासून सुरु होणाऱ्या अंतिम सामन्यात पहिल्यांदाच विजेतेपदाच्या ट्रॉफीवर नाव करण्यास उत्सुक असेल तर दिल्लीचा संघही विजेतेपदासाठी त्यांना चांगलीच टक्कर देईल.