रणजी ट्रॉफी: विदर्भाची बंगाल विरुद्ध मोठया विजयाकडे वाटचाल !

बंगाल विरुद्ध विदर्भ संघात चालू असलेल्या रणजी सामन्यात विदर्भाने बंगालला फॉलोऑन देऊन मोट्या विजयाकडे वाटचाल केली आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवसाखेर बंगालने दुसऱ्या डावात ३ बाद ८६ धावा केल्या आहेत.

विदर्भाकडून फॉलोऑन मिळाल्यावरही बंगालची दुसऱ्या डावात सुरवात खराब झाली. त्यांचे दोन्हीही सलामीवीर अभिषेक रमण(६) आणि अभिमन्यू इस्वरन(२) हे लवकर बाद झाले. त्यांच्या पाठोपाठ लगेचच कौशिक घोष शून्यावर बाद झाला.

त्यामुळे विदर्भाची अवस्था ३ बाद १० धावा अशी झाली होती. त्यानंतर मात्र कर्णधार मनोज तिवारी (३६) आणि तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या सुदीप चॅटर्जी(४०) यांनी डाव सांभाळत नाबाद ७६ धावांची भागीदारी केली आहे. हे तीनही बळी ललित यादवने घेतले.

तत्पूर्वी, पहिल्या डावात बंगालने सर्वबाद २०७ धावा केल्या होत्या. यात फक्त कर्णधार मनोज तिवारी(५०) आणि कौशिक घोषने(५०) अर्धशतकी खेळी केली होती. बाकीच्या कोणत्याही फलंदाजाला विशेष काही करता आलेले नाही. भारतीय कसोटी संघातील यष्टीरक्षक वृद्धिमान सहा हा देखील शून्यावर बाद झाला.
त्याचबरोबर त्यांच्या सलामीवीर अभिषेक(२७) आणि अभिमन्यू(०) यांनीही चांगला खेळ केला नाही. त्यामुळे बंगाल २९२ धावांनी मागे पडले आणि त्यांना फॉलोऑन स्वीकारावा लागला.

विदर्भाकडून अक्षय वखरे ने ३ बळी घेतले, तसेच ललित यादव , रजनीश गुरबानी आणि आदित्य सरवटे यांनी प्रत्येकी २ बळी घेतले. तर सिद्धेश नेरळने १ बळी घेतला.

विदर्भाने पहिल्या डावात सर्वबाद ४९९ धावा केल्या होत्या. यात फेज फेझल(१४२) आणि संजय रामास्वामी(१८२) यांनी शतके झळकावली होती. त्याचबरोबर आदित्य सरवटे(८९) याने अर्धशतकी खेळी केली.

संक्षिप्त धावफलक:
विदर्भ पहिला डाव: सर्वबाद ४९९
बंगाल पहिला डाव: सर्वबाद २०७ ( फॉलोऑन)
बंगाल दुसरा डाव: ३ बाद ८६ धावा
मनोज तिवारी (३६) आणि सुदीप चॅटर्जी(४०) खेळत आहे.