रणजी ट्रॉफी: विदर्भाचा बंगालविरुद्ध मोठा विजय

बंगाल विरुद्ध विदर्भ संघात चालू असलेल्या रणजी सामन्यात विदर्भाने बंगालवर १० विकेट्सने विजय मिळवला आहे. बंगालने फॉलोऑन मिळाल्यानंतर दुसऱ्या डावात ३०६ धावा करत विदर्भाला फक्त १५ धावांचे लक्ष्य दिले जे विदर्भाने सहज पूर्ण केले.

दुसऱ्या डावात विदर्भाचे सलामीवीर संजय रामास्वामी (१६*) आणि फेज फैझल(२*) यांनी १.३ षटकातच १५ धावांचे लक्ष्य पूर्ण केले. पहिल्या डावत या दोघांनीही शतकी खेळी केली होती.

तत्पूर्वी बंगालने फॉलोऑन मिळाल्यानंतर दुसऱ्या डावात कालच्या ३ बाद ८६ धावांपासून पुढे खेळायला सुरवात केली. बंगालकडून आज यष्टीरक्षक फलंदाज वृद्धिमान सहाचे ३ धावांनी थोडक्यात शतक हुकले तो ९७ धावांवर धावबाद झाला.

तसेच सुदीप चॅटर्जीनेही ८२ धावांची अर्धशतकी खेळी केली. हे दोघे सोडले तर बंगालच्या बाकी फलंदाजांना विशेष काही करता आले नाही.

बंगालकडून आज मनोज तिवारी(४३), श्रीवत्स गोस्वामी(१), आमिर गाणी(२२), कनिष्क शेठ(३२*), अशोक दिंडा(०), ईशान पोरेल(०) यांनी धावा केल्या. विदर्भाकडून ललित यादव(५४/४), अक्षय वखारे(६७/१), आदित्य सरवटे(५९/३) आणि सिद्धेश नेरळ(७६/१) यांनी बळी घेतले.

संक्षिप्त धावफलक:
विदर्भ पहिला डाव: सर्वबाद ४९९
बंगाल पहिला डाव: सर्वबाद २०७ ( फॉलोऑन)
बंगाल दुसरा डाव: सर्वबाद ३०६ धावा
विदर्भ दुसरा डाव: बिनबाद १८ धावा

सामनावीर: संजय रामास्वामी ( १८२ आणि १६* धावा)